बेळगावने राज्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्यामुळे बेळगावला कर्नाटकच्या क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ म्हंटले जाते. मात्र अलीकडच्या काळात बेळगावचे क्रीडा क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासले असून या ठिकाणच्या क्रीडापटूंना चांगली मैदाने, उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षक उपलब्ध होत नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कर्नाटकाचा क्रीडा क्षेत्रातील आधारस्तंभ असा बेळगावचा नावलौकिक आहे. बेळगावातून अनेक दिग्गज खेळाडू निर्माण झाले ज्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगाव शहर कर्नाटकचे नाव उज्वल केले. सध्या मात्र स्वतंत्र्य प्रशिक्षण आणि मैदानांअभावी तसेच उत्तम प्रशिक्षक नसल्याने अनेक खेळाडू मागे पडत आहेत.
जिल्ह्यातील सर्वोत्तम प्रशिक्षणाकरिता उपलब्ध असलेले जिल्हा क्रीडांगण हे टेंडरच्या कचाट्यात अडकल्याने येथील सिंथेटीकट्रॅककडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा क्रीडांगणाच्या खेळा ऐवजी राजकीय मेळावे आणि कार्यक्रमासाठी वापर केला जात असल्यामुळे येथील सिंथेटिक ट्रॅकवर तडे पडून त्याची दुरावस्था झाली आहे. या ट्रॅकची व्यवस्थित देखभाल होत नसल्यामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
त्याचबरोबर जिल्हा क्रीडांगणावरील क्रीडा साहित्य आणि सुविधा विकसित झालेल्या नाहीत. अनेक वर्षीपासून क्रिडा उपकरणे -साहित्य तेच असून ते मोडकळीस आले आहे. बेळगाव जिल्ह्यात अशोकनगर, कडोली, चिकोडी, सौंदत्ती, येळ्ळूर, यमकनमर्डी, खानापूर, अशा ठिकाणी इनडोअर किंवा आउटडोअर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र कांही ठिकाणी क्रीडांगण उपलब्ध असूनही तेथे प्रशिक्षक नसल्याने प्रशिक्षण घेणाऱ्या क्रिडापटू मुला-मुलींचे योग्य मार्गदर्शना अभावी नुकसान होत आहे. याव्यतिरिक्त शहर आणि जिल्ह्यातील कांही क्रीडा संकुलं 3 -4 वर्षांपूर्वी उद्घाटन होऊन सुद्धा आजही बंद अवस्थेत आहेत.
यापूर्वी बेळगावच्या सुप्रसिद्ध सीपीएड मैदानाचा जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी उपयोग केला जाता होता. परंतु आता मैदानाचा वापर खाजगी प्रदर्शना करिता केला जातो. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून क्रिकेटसाठी चर्चेत असलेल्या सरदार्स मैदानाची अवस्था सीपीएड पेक्षा अधिक वाईट आहे. या मैदानाचा वापर राजकीय आणि व्यावसायिक कारणासाठी तर केला जातो शिवाय रात्रीचे वेळी हे मैदान दारु आणि मटका याचा अड्डा बनलेले असते.
बेळगावात कमतरता असलेल्या खेळ म्हणजे जिम्नॅस्टिक, नेमबाजी, बास्केटबॉल, घोडेस्वार, त्याच प्रमाणे हॉकी खेळ देखील आता कमी होऊ लागला आहे. देशाचे तत्कालीन क्रीडा मंत्री नेमबाज राजवर्धन राठोड 2016 रोजी बेळगावला भेट दिली होती. त्यावेळी नेमबाजबद्दल विशेष चर्चा करण्यात आली होती. मात्र अद्याप यासंदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही. बेळगाव ज्यासाठी सुप्रसिद्ध आहे ते खेळ म्हणजे ॲथलेटिक्स, जलतरण, ज्युडो, कुस्ती, आणि वेटलिफ्टिंग होय. पूर्वी खो-खो साठी देखील बेळगाव प्रसिद्ध होते. हे खेळ वगळता कोणत्याही खेळामध्ये आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गवसणी घातली नाही. योग्य मार्गदर्शनाअभावी सध्या इनडोअर आणि आउटडोअर खेळ खेळणाऱ्या उदयोन्मुख क्रीडापटूंना कोणत्या कोणत्या क्रीडा प्रकाराला अधिक प्राधान्य द्यावे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. एका बाजूला सरकार आशिया व ऑलम्पिक स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन देते. तथापि दुर्दैवाने बेळगावमध्ये मात्र उलट चित्र असून या ठिकाणी खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होताना दिसते.