दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि.17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर मंडप उभारण्यात येणार असून त्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी सकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली.
भजन, कीर्तन आणि हरेकृष्ण महामंत्राच्या उच्चाराने झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनेक भक्त उपस्थित होते. दि.17 रोजी सायंकाळी 4 वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार शहापूरमार्गे बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेस कडून इस्कॉन मंदिरावर गेल्यानंतर विविध कार्यक्रम होऊन रात्री यात्रेची सांगता होईल.
*इस्कॉन तर्फे रामनवमी साजरी*
रामनवमीचे औचित्य साधून इस्कॉन तर्फे तीन दिवस श्रीराम कथेचे आयोजन केले होते इस्कॉन चे अध्यक्ष पपू भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी श्रीरामांच्या जीवनावर तीन दिवस कथाकथन केले. रविवारी समारोप करताना ते म्हणाले की, वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या देशात रामायण सांगण्यात आलेले आहे.
पण वाल्मीकि रामायण हेच मूळ रामायण आहे. त्याच्या आधारावरच भारतातील विविध भाषांत तसेच इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ यासारख्या देशात रामायणाचा अभ्यास केला जातो.