बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध मेसर्स आयडियल फूड प्रोडक्ट्स कंपनीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा काल शुक्रवारी सायंकाळी उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टर येथे आयोजित मे. आयडियल फूड प्रोडक्ट्सच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची सुरुवात सुप्रीता लोकूर हिच्या ईशस्तवनाने झाली. स्वागत आणि प्रास्ताविकानंतर आयडियल फूड प्रोडक्ट्सच्या छोट्या रोपट्याचे कसे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले याची व्हिडीओ चित्रफीत सादर करण्यात आली.
या चित्रफितीची सांगता मे. आयडियल फूड प्रोडक्ट्सचे संस्थापक गुरुराज अर्थात जी. जी. लोकुर आणि त्यांच्या पत्नी सुमन लोकूर यांच्या लक्षवेधी कृष्णधवल छायाचित्राने झाली. यावेळी गुरुराज लोकूर यांनी आयडियल फूड प्रोडक्ट्सची कशी स्थापना केली. कशाप्रकारे अनंत अडचणींना तोंड देत आपला उद्योग नावारूपाला आणला. त्यानंतर त्यांचे चिरंजीव समीर आणि सुबोध यांनी ‘आयडियल’चा विस्तार देशभरात कसा वाढविला.
गूडशेड रोड येथील एका शेडमधील छोट्या उद्योगाचे उद्यमबाग येथील अत्याधुनिक दुमजली फॅक्टरीत कसे परिवर्तन केले याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आयडियल फूड प्रोडक्ट्सचा परिवार संघटित ठेवण्यासाठी सुमन लोकुर यांनी घेतलेले कष्ट आणि केलेल्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
सदर कार्यक्रमात मान्यवरांची खाद्य उद्योग क्षेत्रातील लोकूर परिवाराच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. त्यानंतर गुरुराज अर्थात जी. जी. लोकूर, समीर लोकूर आणि सुबोध लोकूर यांचा शाल, श्रीफळ देण्याबरोबरच म्हैसुरी पगडी घालून सत्कार करण्यात आला. यावेळी आपली नातवंडे स्नेहा, श्रेया, वैष्णवी, ऋषिकेश आणि श्रीनिवास यांनी खास तयार केलेला केक गुरुराज लोकुर यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कापला.
सत्काराला उत्तर देताना आपल्या समयोचित भाषणात समीर लोकूर यांनी मे. आयडियल फूड प्रॉडक्ट्स ही कंपनी अनेकांच्या विश्वासावर टिकून आहे एकमेकांवरील विश्वास आणि कंपनीशी असलेली बांधिलकी याच्या जोरावर आज आम्ही इथवर पोहोचलो आहोत. तुमच्या सर्वांशिवाय हा प्रवास यशस्वी झाला नसता. माझे कर्मचारी ही माझी शक्ती आणि कंपनीचा कणा आहेत, असे सांगितले. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयडियल फूड प्रॉडक्ट्स कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्यास बेळगावसह नवी दिल्ली, लखनऊ, हैदराबाद, चेन्नई, मंगळूर, पुणे, कोल्हापूर आदी देशभरातील विविध ठिकाणचे वितरक उपस्थित होते.
त्या सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. आयडियल फूड प्रॉडक्ट्स कंपनीमध्ये सध्या समीर, सुकन्या, सुबोध, शिल्पा व इतर लोकुर कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग आहे. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास गुरुराज लोकूर यांचे घनिष्ठ मित्र अशोक अध्यापक, मनोहर बागेवाडी आणि मधुकर परांजपे यांच्यासह निमंत्रित मान्यवर, आप्तस्वकीय, मित्रमंडळी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशय टाकळकर यांनी केले.