ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित, सात दिवस सौंदर्य पाहण्याची पर्यटकांना संधी-बेळगाव – देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा प्रसिद्ध धबधबा यंदा ऐन उन्हाळ्यात प्रवाहित झाला आहे. विजापूर, बागलकोट, जमखंडी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हिडकल जलाशयातून दोन टीएमसी पाणी घटप्रभा नदी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.ऐन उन्हाळ्यात गोकाकचा धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना सृष्टी सौंदर्य पाहण्याची आगळी संधी लाभली आहे.
पावसाळ्यात घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत असते. त्यामुळे पावसाळ्यातील तीन महिने गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असतो.
धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक गोकाकला भेट देत असतात. उन्हाळ्यात घटप्रभा नदी कोरडी पडते. त्यामुळे धबधबा ही लुप्त होतो. परिसराचे सौंदर्य विरून जाते. पण यंदा विजापूर, बागलकोट जमखंडी भागात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
या भागातील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने हिडकल जलाशयातून दोन टीएमसी पाणी सोडले आहे. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे गोकाक धबधबा प्रवाहीत झाला आहे.