अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे ग्राहक हक्कांसंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेतर्फे गेल्या 29 व 30 मार्च रोजी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे ग्राहकांच्या हक्कासंदर्भात माहिती देणे आणि फसवणुकीच्या विरोधात लढा याबाबत माहिती देऊन ग्राहकाला कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ अ. भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राज्याध्यक्ष मुक्तार इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्यासह अ. भा. ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनंत शर्मा, संस्थेचे महासचिव देवेंद्र तिवारी, सुरज राऊत, महिला विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्चना मेस्त्री, राज्य महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे ॲड. यतनट्टी यांनी समयोचित विचार व्यक्त केल्यानंतर डॉ. आनंद शर्मा यांनी यावेळी बोलताना ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सुरज प्रकाश व देवेंद्र तिवारी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शतावरी राऊत यांनी, तर आभार प्रदर्शन राज्य महिला सचिव रेश्मा यांनी केले. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमदार सतीश जारकीहोळी यांचे सहकार्य लाभले हे विशेष होय. सदर दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय कार्यशाळेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.