अंगणवाडी सेवा उद्देशांतर्गत आधीच अंगणवाडी कार्यकर्त्यांना भरपूर कामे आहेत ती करतानाच कार्यकर्त्यांची पुरेवाट होते तेव्हा यात भर म्हणून बीएलओ कामाची जबाबदारी आपल्यावर सोपवू नये, अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी सहकारी संघ (सीटू) बेळगाव तालुका समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य अंगणवाडी सहकारी संघ बेळगाव तालुका समितीच्या अध्यक्षा मंदा नेवगी यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अंगणवाडी सेवा व देशांतर्गत आधीच अंगणवाडी कार्यकर्त्यांना बरीच कामे असतात. त्यात त्यांना गर्भवती महिलांना आहार सामुग्री वितरित करावी लागते. शिवाय अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वर्षे वयाची मुले असतात त्यांची काळजी घ्यावी लागते. वजन कमी असलेल्या मुलांवर दवाखान्यात नेऊन औषध उपचार करावे लागतात. प्रसुत महिलांसाठी भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत कामे करावी लागतात. याखेरीज मातृ वंदना योजनेचे अर्ज भरून द्यावे लागतात. या सर्व कामांचा अंगणवाडी कार्यकर्त्यांवर मोठा ताण असल्यामुळे त्यांच्यावर बीएलओ अर्थात निवडणूक ओळखपत्र तयार करण्याचे काम सोपवू नये, अशी आमची मागणी असल्याचे अध्यक्षा मंदा नेवगी यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.
बीएलओचे काम अंगणवाडी कार्यकर्त्यांना नको, यासाठी अंगणवाडी सेवा उद्देशांतर्गत कामे, गर्भवती महिलांना आहार सामुग्री वितरित करणे, मुलांची काळजी घेणे आदी कामांचा ताण हे एक कारण तर आहेच, या खेरीज आणखीन एक धक्कादायक कारण म्हणजे राजकीय पक्षाच्या नेते मंडळींकडून येणारा दबाव हे होय. ही नेते मंडळी मतदारसंघाबाहेरील स्थानिक रहिवासी नसलेल्या लोकांची निवडणूक ओळखपत्रे बनवून देण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांवर दबाव आणत असतात. त्यासाठी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येते किंवा पाणी नसलेल्या जागी तुमची बदली करून असे धमकावले जाते. त्यामुळेच राजकारणापासून चार हात दूर राहण्यासाठी ‘आपण बरे आपले काम बरे’ अशी भूमिका घेत अंगणवाडी कार्यकर्त्या बीएलओ कामाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दर्शवत असल्याचेही या वेळी एका पदाधिकाऱ्याने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी मंदा नेवगी यांच्यासमवेत सुरेखा कांबळे, मीनाक्षी दपडे, उज्वला लाखे, शकिला हुद्देण्णावर आदींसह बहुसंख्य अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.