युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 21 विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने सुखरूप सुरक्षितपणे त्यांच्या स्वगृही पोचवण्याचे कार्य केले आहे असे सांगून या विद्यार्थ्यांना अर्ध्यावर सोडावे लागलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी राज्यासह देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगाव येथे आज शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 21 विद्यार्थी-विद्यार्थिनींना केंद्र आणि राज्य सरकारने सुखरूपपणे त्यांच्या घरी पोचवण्याचे कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्वजण सुरक्षितपणे आपापल्या घरी पोहोचतील अशी व्यवस्था केली होती.
केंद्र सरकारने संबंधित विद्यार्थ्यांना युक्रेनहून दिल्लीमध्ये आणले आणि तेथून राज्य सरकारने जिल्हा प्रशासनामार्फत त्यांची त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. आज ती सर्व मुले आपल्या सर्वांमध्ये सुरक्षित आहेत आणि त्यांचे कुटुंबीय देखील खुश आहेत.
युक्रेनहून सुखरूप परतलेल्या 21 विद्यार्थ्यांमध्ये रायबाग, निपाणी, कागवाड तालुक्यातील प्रत्येकी 1, अथणी तालुक्यातील 5, मुडलगी, गोकाक, बैलहोंगल, चिकोडी, येथील प्रत्येकी 2, आणि बेळगाव शहर व तालुक्यातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परतावे यासाठी सरकारने खास 24×7 सहाय्यवाणी कक्ष स्थापला होता. त्यामुळे कोणताही त्रास न होता सर्व विद्यार्थी सुखरूप परतले.
आता या विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा धीर कारजोळ यांनी दिला. या विद्यार्थ्यांचे युक्रेनमधील शिक्षण अर्धवट राहिले आहे. ते शिक्षण पूर्ण करण्याची संधी त्यांना येथे देशात दिली जाईल असेही जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.