बेळगाव शहरात ठिकठिकाणी लक्ष देऊन वाहतूक नियंत्रणासह रहदारी नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी रहदारी पोलिसांकडून वाहनचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार हिंडलगा आणि गणेशपूर रोडवर घडत असल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेळगाव शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतुकीवरील ताण वाढला आहे. याकडे लक्ष देऊन शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकडे तसेच रहदारी नियमांच्या अंमलबजावणीकडे रहदारी पोलिसांचे साफ दुर्लक्ष आहे.
हे काम करण्याऐवजी गणेशपूर आणि हिंडलगा मार्गावर थांबून ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनचालकांना वेठीस धरण्यात रहदारी पोलीस धन्यता मानत असल्याचा आरोप केला जात आहे.
हिंडलगा मार्गावर परवा रुग्ण महिलेला आपल्या दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या एका सर्वसामान्य इसमाला रहदारी पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात विशेष करून हेल्मेटचा वापर केला जात नाही. हेल्मेट नसल्याच्या कारणासह अन्य कांही कारणे पुढे करून पोलिसांनी संबंधित इसमाकडे 1 हजार रुपयांची मागणी केल्याचे समजते. यापद्धतीने दररोज हिंडलगा व गणेशपुर मार्गावर रहदारी नियमांच्या नावाखाली पोलिसांकडून वाहनचालकांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. चंदगड, कोवाड आदी महाराष्ट्रातील गावांमधील वाहनचालक कामानिमित्त मोठ्या संख्येने दररोज हिंडलगा रोड मार्गे बेळगावला ये -जा करत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या नेमक्या या लोकांनाच पोलिसांकडून लक्ष्य केले जात असल्याचे समजते.
सर्वसामान्यांना कायद्यायचे आणि रहदारी नियमांचे धडे देणाऱ्या खुद्द रहदारी पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई अथवा त्यांची वाहन उचलून घेऊन जाण्याचे प्रकार करणारे पोलीस स्वतः मात्र ‘नो पार्किंग’ जागेत आपली वाहने खुशाल पार्क करत असतात.
समादेवी गल्ली येथील मारुती मंदिरासमोर असा प्रकार नुकताच निदर्शनास आल्यामुळे नागरिकांत सखेद आश्चर्य व्यक्त होताना दिसत होते. तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित पोलिसांना चांगली समज देण्याबरोबरच गणेशपुर आणि हिंडलगा मार्गावर होणारी वाहनचालकांची लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे.