कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार येत्या 28 मार्च ते 11 एप्रिल या काळात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ये-जा करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेपरच्या दिवशी मोफत बस सेवेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दहावीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली असून परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करीत असतात.
त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत बस मधून विनातिकीट ये-जा करता येणार आहे. परिवहन महामंडळाने याबाबत आदेश जारी केला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्रास होऊ नये याकरीता दरवर्षी परिवहन महामंडळाकडून मोफत बसप्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सामान्य आणि एक्सप्रेस बसमधून प्रवास करता येतो.
दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचा बस थांबविण्याची विनंती केल्यास त्यांना सहकार्य करावे. कांही ठिकाणी परीक्षा केंद्रे बसस्थानकापासून दूर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी बस थांबवावी, असा अशा प्रकारच्या सूचना परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.