हिंदूंचा पवित्र धार्मिक सण महाशिवरात्र देशभरासह बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचे कार्यक्रम आज शहरासह तालुक्यातील मंदिर व शिवालयांच्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
महाशिवरात्रीनिमित्त आज दुपारी शहर उपनगरातील बरीच मंदिर -शिवालयांच्या ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिर येथे आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचा शहर परिसरातील सुमारे 15 हजारहून अधिक भाविकांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट समितीने या कार्यक्रमाचे अतिशय नीटनेटक्या आणि सुरळीत पद्धतीने नियोजन केले होते.
नेहरूनगर येथील श्री बसवाण्णा महादेव मंदिराच्या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला दुपारी 12:30 वाजता प्रारंभ झाला. सदर तीन -चार तास चाललेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी देखील शेकडो भाविकांनी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. वाडा कंपाउंड वडगाव येथील शिवमंदिर, शनिवार खुट येथील मंदिर आदी शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणच्या मंदिर -शिवालयांच्या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कामत गल्ली येथे आयोजित महा प्रसाद कार्यक्रमात लाभ शेकडो भाविकांनी घेतला होता.
*श्री एकदंत युवक मंडळ संचलित* *श्री दुर्गाशक्ती महिला मंडळ**विनायक मार्ग,समर्थ नगर**यांच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त* *बुधवार दिनांक 2/3/2022 रोजी विनायक मार्ग,समर्थ नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर , श्री कलमेश्वर, श्री रामेश्वर, श्री रामलिंग, श्री ब्रह्मलिंग आदी शिवस्वरूप मंदिरं आहेत. शहर उपनगरांप्रमाणे बेळगाव तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त आज बुधवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कणबर्गी येथील डोंगराच्या कुशीत वसलेले श्री सिद्धेश्वर मंदिर, उचगाव येथील श्री रामलिंग मंदिर कुद्रेमनी नजीकचे श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान, बिजगर्णी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिर, तीर्थकुंडे येथील रामलिंग मंदिर आदी तालुक्यातील विविध ठिकाणी आज आयोजित महाप्रसादाचा संबंधित पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी लाभ घेतला.