के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित दुसऱ्या के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला आज रविवारपासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आजच्या उद्घाटना दिवशीचा सकाळचा पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यात झेवर गॅलरी डायमंड्स संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर सदर स्पर्धेच्या चषकांचा अनावरण सोहळा काल शनिवारी आमदार अनिल बेनके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर आज रविवारी स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. प्रारंभी प्रमुख पाहुणे सुमित छाब्रिया व प्रणय शेट्टी यांच्या हस्ते यष्टी पूजनासह नाणेफेक करण्यात आली.
याप्रसंगी वासिम धामणेकर, पुनीत शेट्टी, माजिद मकानदार, केतज कोल्हापुरे व नासीर पठाण या निमंत्रित पाहुणे मंडळींसह बहुसंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्पर्धेचा आजचा सकाळचा साईराज वारियर्स विरुद्ध विशृत स्ट्रायकर यांच्यातील उद्घाटनाचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दुपारच्या दुसऱ्या सामन्यात झेवर गॅलरी डायमंड्स संघाने प्रतिस्पर्धी के. आर. शेट्टी किंग्स संघावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना के. आर. शेट्टी संघाने 18 षटकात 8 गडी बाद 132 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल झेवर गॅलरी संघाने 17.1 षटकात 5 गडी बाद 134 धावा काढून सामना खिशात टाकला.
सामन्याच्या समाप्तीनंतर आयोजित पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्र. 9 चे नगरसेवक इंद्रजित पाटील, डाॅ. ऋतुराज चौगुले, चेतन अक्कोळी, प्रणय शेट्टी व ए. देसाई उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सामन्यात सर्वाधिक 48 धावा झळकविणाऱ्या झेवर गॅलरीच्या माजिद मकानदार याला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वाधिक षटकारांचे बक्षीस रब्बानी दफेदार, उत्कृष्ट झेलाचे बक्षीस शाम अप्पणावर आणि इम्पॅक्ट खेळाडूसाठी असणारे पारितोषिक वैभव कुरिबागी याला प्रदान करण्यात आले.