एचआयव्ही बाधित आणि वंचित मुलांसाठी मानवतावादी कार्य करणाऱ्या महेश फाउंडेशनला संबध्द करण्यात आम्हाला आनंद होत आहे. संबंधित मुलांना या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, असे उद्गार इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक सचिन एस. पुजार यांनी काढले.
शहरातील महेश फाउंडेशन येथे आयोजित परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात पुजार यांनी एचआयव्ही बाधित आणि वंचित मुले तसेच महिलांमधील कौशल्य विकासासाठी महेश फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराची देखील स्तुती केली. सदर कार्यक्रमात नूतन कौशल्य आणि नवोपक्रम केंद्र उभारणीसाठी सीएसआर अंतर्गत महेश फाउंडेशनचे संस्थापक महेश जाधव आणि इंडिया शेल्टर फायनान्स कारपोरेशनचे शाखा व्यवस्थापक सचिन पुजारी यांनी परस्पर सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षऱ्या केल्या.
नियोजित कौशल्य आणि नवोपक्रम केंद्राच्या उभारणीमुळे शेकडो वंचित मुलांचा कौशल्य विकास होऊन त्यांना चरितार्थाचे साधन उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. इंडिया शेल्टर फायनान्स कारपोरेशन लि. ही एक प्रख्यात गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. जी आता एचआयव्ही बाधित आणि वंचित मुलांच्या कौशल्य विकासाच्या प्रकल्पासाठी महेश फाउंडेशनला सहकार्य करणार आहे. महेश जाधव यांनी यावेळी बोलताना प्रथम इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला धन्यवाद दिले.
सदर कंपनीशी झालेला सामंजस्याचा करार हा महेश फाउंडेशनच्या प्रवासातील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन शेल्टर फायनान्सच्या सहकार्याने आम्ही गरजू महिलांना कौशल्यपूर्ण स्वावलंबी बनविण्याची आमची मोहीम यशस्वी करण्यासाठी अधिक परिश्रम घेऊ, असे ते म्हणाले.
महेश फाऊंडेशन ही संस्था गेल्या 14 वर्षापासून एचआयव्ही बाधित आणि वंचित मुलांच्या कल्याणासाठी कार्य करत आहे. या फाउंडेशनने आत्तापर्यंत हजारो वंचित मुलांना मदतीचा हात दिला असून 2000 हून अधिक एचआयव्हीबाधित मुलांची सेवा सुश्रुषा केली आहे. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार विजेते पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर यांनी देखील महेश फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी इंडिया शेल्टर फायनान्स लि.चे रामचंद्र कुळेन्नावर यांच्यासह महेश फाउंडेशनचा कर्मचारीवर्ग, स्वयंसेवक आणि संस्थेतील मुले उपस्थित होती.