आगामी 2022 -2023 शैक्षणिक वर्षासाठी बिगर सरकारी संस्था /खाजगी शाळा /राज्य सरकार यांच्याशी भागीदारी पद्धतीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नव्या 21 सैनिक स्कूल्सना मंजूरी दिली आहे. यामध्ये बैलहोंगल तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना सैनिक स्कूलचा समावेश आहे.
भागीदारी पद्धतीवर केंद्र सरकार देशभरात 100 नवी सैनिक स्कूल्स सुरू करणार असून 21 सैनिक स्कूलला मंजूरी हा त्याचा पहिला टप्पा आहे. सध्याच्या सैनिक स्कूल्स पेक्षा या स्कूल्स भिन्न असतील. बैलहोंगल तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या सैनिक स्कूलचे बांधकाम या वर्षअखेर पूर्ण होणार आहे. या सैनिक स्कूल इमारत बांधकामासाठी 230 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे आणि संरक्षण दलात सामील होण्याबरोबरच त्यांना नोकरी-व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा देशभरात 100 सैनिक स्कूल्स सुरू करण्यामागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मूळ उद्देश आहे. त्याचप्रमाणे याद्वारे खाजगी क्षेत्राला सरकारच्या हातात हात घालून काम करण्याची संधी उपलब्ध होऊन राष्ट्र उभारणीसाठी आजच्या युवा पिढीला परिष्कृत करून उद्याचे जबाबदार नागरिक घडविता येणार आहेत.
मंजूर झालेल्या सैनिक स्कूलची नावे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार www.sainikschool.ncog.gov.in येथे उपलब्ध करण्यात आली आहे. सदर सैनिक स्कूल पैकी 17 ब्राऊनफिल्ड स्कूल्स आणि 4 ग्रीनफिल्ड स्कूल्स असून ज्या लवकरच कार्यरत होणार आहेत. मंजूर करण्यात आलेल्या नव्या सैनिक स्कूलच्या यादीमुळे 12 स्कूल्समध्ये बिगर सरकारी संस्था /ट्रस्ट /सोसायट्यांची भागीदारी असेल. उर्वरित नव्या सैनिक स्कूलपैकी 6 मध्ये खाजगी शाळा आणि 3 मध्ये राज्य सरकारच्या शाळांची भागीदारी असेल.
पूर्णपणे निवासी पद्धतीच्या असणाऱ्या सध्याच्या सैनिक स्कूलप्रमाणे नव्या 7 सैनिक स्कूल्स या डे स्कूल असतील तर उर्वरित 14 नव्या मंजूर झालेल्या सैनिक स्कूलमध्ये निवासाची व्यवस्था असणार आहे. सदर सैनिक स्कूल्सची कार्यपद्धती आणि अधिक माहिती www.sainikschool.ncog.gov.in येथे उपलब्ध असून आपल्या मुलांना या सैनिक स्कूलमध्ये घालू इच्छिणाऱ्यांनी वेबपोर्टलला भेट देऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.