बेळगावमध्ये वाहनांची संख्या वाढण्याबरोबर नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रादेशिक परिवहन खाते अर्थात आरटीओकडून उगारण्यात आलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे 2020 -21 आणि 2021 -22 सालात आत्तापर्यंत एकूण तब्बल 7 कोटी 16 लाख 22 हजार 530 रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला आहे. आरटीओच्या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे मात्र दणाणले असले तरी नियमांची पायमल्ली करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षापेक्षाही या वर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून सरकारच्या तिजोरीतही कर स्वरूपात मोठी रक्कम जमा झाली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 -21 साली वाहन चालकांनी नियम मोडला तरच दंड आकारण्यात आला होता. वाहनांवर नंबर प्लेट नसणे, हेल्मेट नसणे, वाहन परवाना नसणे, वाहनांचा विमा नसणे, वाहनांची मुदत संपणे यासह इतर नियम मोडणार्याकडून हा दंड आकारण्यात आला आहे.
मागील वर्षापेक्षा म्हणजेच यावर्षी गेल्या दहा महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे 2021 -22 सालात 3 कोटी 34 लाख 38 हजार 187 रुपये कर स्वरूपात तर 59 लाख 35 हजार 640 रुपये दंड स्वरूपात जमा झाले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकारी सुसाट आणि वाहनधारक मात्र कचाट्यात अशी अवस्था झाली आहे.
यंदाच्या 2021 -22 सालातील गेल्या एप्रिल ते जानेवारीपर्यंत कर व दंडाच्या स्वरूपात जमा झालेली रक्कम (अनुक्रमे महिना, कारवाई केलेल्या वाहनांची संख्या व एकूण रक्कम) यानुसार पुढील प्रमाणे आहे. एप्रिल : वाहने 408 -एकूण रक्कम 4320542 रुपये, मे : वाहने 50 -548254 रु., जून : वाहने153 -1971745 रु., जुलै : वाहने 280 -5071816 रु., ऑगस्ट : वाहने 259 -5204196 रु., सप्टेंबर : वाहने 229 -49417544 रू., ऑक्टोबर : वाहने 224 -4090443 रु., नोव्हेंबर : वाहने 211 -4718336 रु., डिसेंबर : वाहने 172 -5141512 रु., जानेवारी : वाहने 124 -36655235 रुपये. या पद्धतीने गेल्या एप्रिल ते जानेवारीपर्यंत एकूण 2110 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून कर व दंडाच्या स्वरूपात 3,93,73,836 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
सध्या बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 6 लाख 5 हजार 421 वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामधील मालवाहतूक न करणारी 5 लाख 62 हजार 554 वाहने आहेत. बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या प्रचंड आहे. या आरटीओ कार्यक्षेत्रात बेळगाव आणि खानापूर तालुक्याचा समावेश आहे. सदर तालुक्यांमध्ये अवजड आणि लघु अवजड वाहतूक करणारी 42 हजार 867 वाहने आहेत. याचबरोबर दुचाकींची संख्या 4 लाख 81 हजार 588 इतकी आहे. अवजड वाहतूक करण्यासाठी तब्बल 9 हजार 426 वाहने आहेत. मध्यम गुड्स वाहतूक करणारी 9910 वाहने असून ऑटोरिक्षा व मॅक्सी कॅब अशी एकूण 7 हजार 897 वाहने आहेत. या वाहनांसह परराज्यातून येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या संदर्भात बोलताना आरटीओ शिवानंद मगदूम यांनी कोरोना काळात आरटीओ विभागाने थोडी विश्रांती घेतली होती तिसरी लाट असल्याने आता पुन्हा कारवाईला जोरदार सुरुवात करण्यात येणार आहे नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवण्यात येईल असे स्पष्ट करून यासाठी नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता वाहन परवाना वाहनांचे विमा व इतर नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.