गावातील रेशन दुकान संपूर्ण गावाच्यावतीने पंच कमिटीच्या अधिकाराखाली चालविण्यात यावे असे ठरलेले असताना राजहंसगड येथील रेशन दुकान एकाने आपल्या कुटुंबाच्या नांवावर करून घेतल्यामुळे काल मंगळवारी रात्री त्या रेशन दुकानदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
राजहंसगड येथील रेशन दुकान हे गावाच्या पंच मंडळींच्या नावे होते. मात्र एकाने विश्वासघाताने सदर दुकान स्वतःच्याच नावे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट पसरून त्या दुकानदाराच्या विरोधात काल मंगळवारी रात्री श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये संपूर्ण राजहंसगड गाव एकवटले होते. यावेळी झालेल्या बैठकीत आपल्या राजकीय वरदहस्तच्या सहाय्याने गावातील रेशन दुकान स्वतःच्या नांवावर करून घेणाऱ्या संबंधित व्यक्तीचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच गावाचा विश्वासघात करून रेशन दुकान बळकावल्याबद्दल त्याला 1 लाख रुपयाचा दंड ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटी आणि गावातील नागरिकांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मिळालेल्या माहितीनुसार राजहंसगड गावामध्ये गेल्या 8 -10 वर्षापूर्वी आय. एस. बुर्लकट्टी नामक व्यक्ती रेशन दुकान चालवत होती. मात्र भ्रष्टाचारा सारख्या कांही गंभीर कारणास्तव त्याच्या रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. सदर घटनेनंतर गावातील लोकांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यानुसार रेशन दुकान कोणा एका व्यक्तीने न चालविता ते गावच्या पंच कमिटीच्या नावे चालविण्याचे ठरले. या निर्णयानुसार आजतागायत गावातील रेशन दुकान चालविले जात होते. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या गावातील एका व्यक्तीने ते रेशन दुकान आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे दाखल करून स्वतःच्या नांवावर करून घेतल्याचे नुकतेच उघडकीस आले. रेशन दुकान गावच्या पंचमंडळींच्या नांवावर चालविण्याचा संपूर्ण गावाचा एकमुखी ठराव झाला असताना हा प्रकार घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी काल मध्यरात्रीपर्यंत गावातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये झालेल्या बैठकीदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसही दाखल झाले होते. सध्या संपूर्ण राजहंसगड गाव त्या दुकानदाराच्या विरोधात एकवटला आहे.