सौंदत्ती रेणुका यल्लमा देवस्थानासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदू देवालयांच्या यात्रा काळात आणि देवस्थान परिसरात मुस्लिम धर्मियांकडून केल्या जाणाऱ्या व्यापाराला विरोध करून त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आंदोलन श्रीराम सेनेने छेडले असल्याची माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिली.
बेळगाव येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सौंदत्ती यल्लमा यात्रा, पंतबाळेकुंद्री यात्रा आणि हुक्केरी येथील होळेम्मादेवी यात्रेसह सर्व ठिकाणी हे आंदोलन छेडले जाणार आहे.
उचगाव येथील मळेकरणीच्या ठिकाणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असंख्य बकऱ्यांचा बळी दिला जातो. त्या ठिकाणी मुस्लिम हलालासाठी येत असतात. आमच्या बकऱ्या, आमचे देव, आमचे मांस, जेवणार आम्ही आणि पैसे घेऊन जाणार मात्र हलाल करण्यास येणारे मुस्लिम. हा प्रकार देखील थांबला पाहिजे, असे प्रमोद मुतालिक म्हणाले.
लवकरच बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख देवस्थानांच्या परिसरातील दुकानांची यादी तयार केली जाणार आहे. या सर्व ठिकाणी हिंदूं दुकानदारांची संख्या जास्त आहे. तेंव्हा मुस्लिम दुकानदारांकडे कोणीही जाऊ नये यासाठी जनजागृती केली जात आहे.
आर्थिक बहिष्कार म्हणजे यात्रेच्या ठिकाणी मुस्लिम लोकांशी हिंदू धर्मीयांनी कोणताही व्यापार -व्यवहार करू नये. कायद्यानुसार हिंदू देवस्थानाच्या 100 मी. परिघामध्ये इतर धर्मियांनी व्यापार -व्यवसाय करू नये असा नियम आहे. राज्य सरकारने या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी सरकारला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल असे मुतालिक यांनी सांगितले.
मुस्लिम लोकांचा विस्तारवाद आणि कट्टरवाद या देशासाठी मारक आहे. मुस्लिम मानसिकतेत जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हा संघर्ष आणि द्वेष कायम राहणार आहे. मुस्लिमांचे कौर्य आणि गोहत्या जोपर्यंत थांबत नाही.
तसेच मुसलमान जोपर्यंत देशाच्या घटनेचा आदर करून येथील नियम कायद्यानुसार वागत नाहीत, बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाची संस्कृती आणि संप्रदायाचा आदर करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील आर्थिक बहिष्कार कायम ठेवला जाईल, असेही प्रमोद मुतालिक यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बेळगाव जिल्हा श्रीराम सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.