बेळगाव शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकार्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडा-झडती घेतली.
गेल्या अर्धा दिवसापासून शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासंदर्भात आमदार ॲड. अनिल बेनके यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना आणि आदेश दिले आहेत.
मात्र तरीदेखील पिण्याच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार बेनके यांनी आज सोमवारी आपला नियोजित बेंगलोर दौरा रद्द करून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.
सदर बैठकीत एल अँड टी कंपनीचे अधिकारी पाणी टंचाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे संतप्त आमदार अनिल बेनके यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच ज्या काही समस्या असतील त्यांचे लगोलग निवारण करून शहरातील पाणीपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करा अन्यथा गंभीर परिणामांना तोंड देण्यास सज्ज राहा, असा सज्जड इशारा आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला.
गेल्या आठवडा भरा पासून बेळगाव शहरांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांचे हाल होतआहेत बेळगाव महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज आहे पाईपलाईन आहे पाणी मुबलक आहे मात्र पुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाल्यामुळे लोकांना पाण्याचे हाल सोसावे लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी आमदार बेनके यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि जर का तुम्ही व्यवस्थित पाणी पुरवठा केला नाही तर ‘तुम्हाला झाडाला बांधून घेऊन मारू’ असा रोखठोक इशारा दिला आता बेनके यांच्या इशाऱ्यानंतर देखील या पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला जाग येईल का हे पाहावे लागणार आहे.