बेळगाव जिल्ह्यातील 4 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यास मंत्री ईश्वराप्पा यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करून केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या बेळगावच्या संतोष के. पाटील नामक कंत्राटदाराकडे त्यासंदर्भात ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याच्या अप्पर मुख्य कार्यदर्शिंनी काल सोमवारी एका नोटीस वजा पत्राद्वारे स्पष्टीकरण मागितले आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याकडून संतोष के. पाटील यांनी आरोपात उल्लेख केलेल्या विकासकामांना अनुमती दिलेले नाही. तसेच सरकारने देखील तशा कोणत्याही विकास कामांना मंजुरी दिलेली नाही.
खात्याच्या कोणत्याही कार्यदर्शिने अथवा प्रशासनाने त्या कामांना अनुमती दिलेली नाही. हिंडलगा गावामध्ये संतोष के. पाटील यांच्याकडून हाती घेण्यात आलेल्या विकास कामाला ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याचे कोणतेही अनुमोदन नाही.
त्याचप्रमाणे कोणत्याही सरकारी एजन्सीने या कामांना तांत्रिक पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे सदर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण खात्याच्या मुख्यस्थांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, प्रसार माध्यमातील बातम्याद्वारे संतोष के. पाटील या कंत्राटदाराने केलेल्या आरोपाची माहिती मिळताच आपण त्याच्याविरुद्ध बेंगलोर येथील अप्पर मुख्य मेट्रोपोलिटन न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला असल्याची माहिती ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी दिली.