महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि परिसरातील शिवालये सजली असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री कपलेश्वर मंदिर देखील याला अपवाद नाही नसून या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव विशेष भक्तिभावाने साजरा केला जात आहे.
श्री कपिलेश्वर मंदिर येथे दरवर्षी महाशिवरात्र उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दरवेळी या ठिकाणी आकर्षक असे देखावे सादर केले जातात. त्या अनुषंगाने यावेळी मंदिराच्या अंतर्गत भागात राजवाड्याची सजावट करण्यात आली असल्याची माहिती कपलेश्वर मंदिर ट्रस्टचे जनसंपर्क प्रमुख अभिजीत चव्हाण यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्युत रोषणाई लाईट इफेक्ट आणि डेकोरेशनच्या सहाय्याने मंदिराचा अंतर्गत भाग एखाद्या राजवाड्या प्रमाणे बनविण्यात आला आहे.
विनायक पालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्युत रोषणाई आणि डेकोरेशनचे संपूर्ण काम केले आहे. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे मंदिराच्या दर्शनीय भागावर 400 चौरस फुटाचे भव्य एलसीडी स्क्रीन बसविण्यात आले आहे. या भव्य स्क्रीनवर मंदिरातील अंतर्गत कार्यक्रम, गाभाऱ्यातील पूजाविधि आणि देव दर्शनाचा लाभ बाहेरच्या बाहेर भाविकांना घेता येणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे भाविकांना रांगेत सुलभ देवदर्शन घडावे यासाठी मंदिर आवारात बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. मंदिरासमोर एक छोटे व्यासपीठ उभारण्यात आले असून या ठिकाणी मंदिराला भेट देणाऱ्या मान्यवर मंडळींचे श्री कपलेश्वर मंदिर ट्रस्ट मंडळींकडून स्वागत केले जात असून त्यांना देवदर्शनासाठी नेण्यात येत आहे. विशेष म्हणजे सध्या उष्मा वाढत असल्यामुळे जमीन तापवून भक्तांना त्रास होऊ नये यासाठी प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत गालीचा घालण्यात आला आहे.
महाशिवरात्रीला प्रारंभ झाल्यानंतर काल सोमवारी रात्री 8 वाजता पालखी प्रदक्षिणा तसेच त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम झाला. सदर कार्यक्रमानंतर बेळगावकर नागरिकांच्यावतीने मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून समस्त शहरवासियांचे कल्याण होऊन त्यांना सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी काल रात्री 12 वाजता देवाला सर्वप्रथम रुद्र अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर इतर भाविकांना अभिषेक विधीसाठी आज पहाटे 5 वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आले होते. या कालावधीत बहुसंख्य भक्तांनी देवदर्शन घेऊन अभिषेक घातला. महाशिवरात्रीनिमित्त आज मंदिरात त्रिकाल पूजा झाल्यानंतर उद्या बुधवार दि. 2 मार्च रोजी महाशिवरात्रीचा 27 वा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे
कोरोना प्रादुर्भाव आणि सरकारी निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षापासून कपलेश्वर मंदिर येथील महाशिवरात्रि उत्सव नियम पाळून साधेपणाने साजरा केला जात आहे यंदाही सरकारी नियमांचे पालन करत तसेच महापालिका आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करून महाशिवरात्र साजरी केली जात आहे. देशातील उत्तर काशी प्रमाणे बेळगावचे श्री कपलेश्वर मंदिर हे दक्षिण काशी म्हणून सुपरिचित आहे. दक्षिणेतील भाविकांची बारा ज्योतिर्लिंग आणि चार धामांची यात्रा कपिलेश्वर देवस्थानातील देवदर्शन आणि कपिल तिर्थातील स्नानाशिवाय सफल होत नाही. 2 हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर असून भगवंताचा पाचवा अवतार मानला जाणाऱ्या कपिलमुनींनी स्वयंभू मूर्तीने हे मंदिर स्थापन केले आहे. श्री कपिलेश्वर मंदिराचा महिमा आगाध आहे. तेंव्हा भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त येथील देवदर्शनासह उद्या बुधवारी होणाऱ्या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंपर्क प्रमुख अभिजित चव्हाण यांनी केले आहे.