Monday, April 29, 2024

/

कणबर्गीचे ‘श्री सिद्धेश्वर’ एक जागृत देवस्थान!

 belgaum

कणबर्गी (ता. जि. बेळगाव) येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान हे बेळगाव परिसरातील अतिशय पुरातन व जागृत देवस्थानांपैकी एक आहे. डोंगरावर असलेल्या या सुप्रसिद्ध देवस्थानाच्या ठिकाणी आज मंगळवारी महाशिवरात्री उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरा केला जात आहे.

कणबर्गी गावानजीक डोंगर माथ्यावरील श्री सिद्धेश्वर देवस्थान हे सुमारे 400 वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात आहे. पूर्वी जंगल प्रदेश झाडाझुडपांनी वेढलेल्या या देवस्थानाच्या ठिकाणी अलीकडच्या काळात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी छोट्या भुयारामध्ये शिवपिंडीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. पूर्वी गर्द झाडाझुडपांनी वेढलेल्या या देवस्थानाचा माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या पुढाकाराने जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

डोंगरावरील या देवस्थानाच्या ठिकाणी कॉंक्रिटचे बांधकाम करून प्रशस्त मंदिर उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डोंगरावरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या तसेच आसपासच्या परिसरात अनेक सुधारणा घडवून घडवून कायापालट करण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्याशी बागबगीचा बरोबरच लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे श्री सिद्धेश्वर देवस्थानाला भेट देणारे भाविक देवस्थानाकडे जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या, सुरूवातीला लागणारी उंच कमान, डोंगर माथ्यावर दिसणारे भव्य मंदिर पाहून भारावून गेल्याशिवाय राहात नाहीत.Sidheshwar temple

 belgaum

माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सदर देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी आत्तापर्यंत 80 ते 90 लाखाचा निधी खर्च करण्यात आला असून जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थानाचे व्यवस्थापन श्री सिद्धेश्वर युवक मंडळ आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान व्यवस्थापन मंडळ यांच्याकडून केले जाते. पूर्वी या देवस्थानाच्या ठिकाणी वीज पुरवठा अथवा पाण्याची सोय नव्हती. मात्र शिवाजी सुंठकर यांनी या ठिकाणी वीज पुरवठ्याची सोय करून दिली. त्याचप्रमाणे उद्यानाची निर्मिती करण्याबरोबरच देवस्थान परिसरात पाण्याची सोय व्हावी यासाठी दोन बोरवेल देखील मारून दिल्या. याखेरीज देवस्थानाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी डोंगराच्या दोन्ही अंगाला रस्ते बांधून दिले आहेत. माजी नगरसेवक संजय सुंठकर यांनी या ठिकाणची उंच कमान बांधून दिली आहे.

महाप्रसादासह सहलीसाठी येणाऱ्याना भोजन तयार करण्यासाठी याठिकाणी शेडची उभारणी करण्यात आली आहे. या पद्धतीने सुंठकर बंधूंनी कणबर्गी श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि परिसराचा आजच्या घडीला सुंदर असा संपूर्ण कायापालट केला आहे. ज्यामुळे येथे भेट देणाऱ्यांना एक प्रकारची आध्यात्मिक शांती मिळण्याबरोबरच शांत -सुंदर वातावरणामुळे एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. सदर देवस्थानातील पूजाअर्चा करण्याचा अर्थात पौरोहित्याचा मान पुजेरी घराण्याकडे आहे. मारुती पुजेरी आणि त्यांचे बंधू देवस्थानातील नित्य पूजाअर्चा आदिंची जबाबदारी पार पाडत असतात.Sidheshwar temple

अत्यंत जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी दर सोमवारी देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. पंचक्रोशीतील भाविकांसह महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविक या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीला तसेच श्रावणामध्ये येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विशेष करून दरवर्षी महाशिवरात्र आणि श्रावणातील दर सोमवारी या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. आज महाशिवरात्री निमित्त कणबर्गी श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी त्याची प्रचिती येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त या देवस्थानाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

या ठिकाणी आज पहाटे 3 वाजल्यापासून देवदर्शनासाठी भाविकांची रिघ लागलेली पहावयास मिळतात आहे. देवस्थानाच्या पायथ्याशी पूजेच्या साहित्याचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणचा परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. नित्य पूजा -अभिषेकाबरोबरच आज रात्री श्री सिद्धेश्वराचा महारुद्राभिषेक होणार असून उद्या बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी जवळपास 15 ते 20 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात, अशी माहिती प्रकाश मुचंडीकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.