महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दिनांक ३ मार्च रोजी बेळगावमधील विविध वृत्तपत्र संपादक, चालक आणि मालकांची सदिच्छा भेट घेतली.
आज बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. संभाजी खराट, माहिती सहायक एकनाथ पोवार, सचिन वाघ, अनिल यमकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दै. रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात बेळगावमधील मराठी वृत्तपत्राच्या समस्यांसंदर्भात त्यांनी यावेळी माहिती दिली.
बेळगावमधील मराठी वृत्तपत्रांच्या समस्यांची दखल घेऊन समस्या सोडविण्यासाठी व्यक्तिगत लक्ष पुरविण्याची ग्वाही उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी दिली. तसेच शासकीय पातळीवर बेळगावमधील मराठी वृत्तपत्रांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दै. रणझुंझारचे संस्थापक मनोहर कालकुंद्रीकर, दै. स्वतंत्र प्रगतीचे संपादक राजेंद्र पोवार, दै. रणझुंझारचे संपादक मनोज कालकुंद्रीकर, साप्ताहिक बेळगाव समाचारचे संपादक मधुकर सामंत, साप्ताहिक राष्ट्रवीरचे संपादक ऍड. राजाभाऊ पाटील, साप्ताहिक लोकमतच्या संपादिका ऍड. शशिकला पाटील, साप्ताहिक बेळगाव सहकार दर्शनच्या व्यवस्थापकीय संपादिका वसुधा सांबरेकर, प्रतिनिधी विजय सांबरेकर आदी उपस्थित होते.