कर्करोगावरील उपचारासाठी असणाऱ्या किडवाई हॉस्पिटलची शाखा उघडण्यासाठी बेळगाव परिसरात जागा पहावी, अशी सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावच्या जिल्हाधिकार्यांना केली आहे.
बेळगाव परिसरात किडवाई हॉस्पिटलसाठी जागा शोधा. यासंदर्भात संबंधित सर्व खात्यांना वेळेवर वर्क ऑर्डर देण्याचे काम मुख्य सचिवांसह अन्य अधिकारी असलेल्या समितीकडून केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
अर्थसंकल्पातील सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापण्यात आली आहे. ही समिती अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या सर्व योजनांची वर्क ऑर्डर येत्या बुधवारी किंवा तत्पूर्वी जारी करणार आहे.
कर्नाटक सरकारने यावर्षी बेळगावमध्ये अत्याधुनिक किडवाई प्रादेशिक केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावातील किडवाई प्रादेशिक कर्करोग केंद्र 50 कोटी रुपयात उभारण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.
आता या केंद्रासाठी फक्त जागा तेवढी उपलब्ध होणे बाकी आहे. वडगाव येथील जेल शाळेसमोर उभारण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या 10 खाटांच्या हॉस्पिटल नजीकची जमीन किडवाई केंद्रासाठी योग्य असल्याचे या भागाच्या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.