भारत आणि जपान यांच्यातील बेळगाव येथे आयोजित केलेला ‘एक्स धर्मा गार्डियन -2022’ या संयुक्त लष्करी कवायतीचा सांगता समारंभ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आज गुरुवारी पार पडला. बेळगावात गेल्या 27 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात आले होते.
कवायतीचा सांगता समारंभ मेजर जनरल भवनेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. भारत आणि जपान सैन्याच्या तुकडीकडून भवनेश कुमार आणि जपान लष्कराचे कर्नल रूचीनो बातो यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी बोलताना कर्नल रूचीनो बातो यांनी संयुक्त लष्करी कवायतीचा हा अनुभव अविस्मरणीय होता असे सांगून भारतीय लष्कराला विशेष करून बेळगावच्या ज्युनियर लीडर्स विंग आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला धन्यवाद दिले. या कवायतीमुळे दोन्ही सैन्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या. जपान आणि भारत देशाचे संबंध या संयुक्त लष्करी कवायतीमुळे निश्चितपणे अधिक दृढ होणार होतील, असा विश्वास कर्नल रुचीनो बातो यांनी व्यक्त केला.
संयुक्त लष्करी कवायत यशस्वी केल्याबद्दल दोन्ही देशाच्या सैनिकांना मी धन्यवाद देतो. या कवायतीमुळे उभय देशांच्या सैनिकांना बरेच नवे शिकायला मिळाले. दोन्ही सैन्यांना युद्धोपयोगी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. भारत आणि जपान यांच्या मैत्रीचा 70 वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. हे दोन्ही देश जगाला लोकशाहीची मूल्ये जपण्याचे आणि शांततेचे संदेश देतात असे प्रतिपादन करून मेजर जनरल भवणेश कुमार यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
‘एक्स धर्मा गार्डियन -2022’ या संयुक्त लष्करी कवायतीमध्ये युद्धाभ्यासासह अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रास्त्रांची हाताळणी याबरोबरच सांस्कृतीक देवाण-घेवाण देखील झाली. सांगता समारंभाप्रसंगी भारत आणि जपानच्या सैनिकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. भारतीय सैनिकांनी दांडपट्टा, ढाल -तलवार, मल्लखांब आदींचे प्रात्यक्षिके, तर जपानी सैनिकांनी मार्शल आर्ट आणि कराटेची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.