भारत आणि जपान यांच्यामधील ‘धर्म गार्डियन -2022’ या गेल्या 27 फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या संयुक्त लष्करी कवायतिचा एक भाग असलेली ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यासाठीची चित्तथरारक मोहीम आज सुरू झाली.
‘धर्म गार्डियन -2022’ अंतर्गत पोलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी भारत व जपान दोन्ही सैन्याच्या संयुक्त पथकाने आज मंगळवारी मोहीम सुरु केली. या चित्तथरारक मोहिमेअंतर्गत हलभावी येथील आयटीबीपी कॅम्प येथे भारत व जपानच्या सैनिकांना हेलिकॉप्टरमधून आकाशातून खाली उतरविण्यात आले.
मैदानावर उतरवण्यात आलेल्या सैनिकांच्या पहिल्या तुकडीने हेलिपॅड सभोवती संरक्षण कडे तयार केले. हेलिकॉप्टरच्या एकूण चार फेऱ्यांमधून भारत आणि जपानच्या सैनिकांना खाली उतरवण्यात आले. हेलिकॉप्टरमधून भारत आणि जपानचे शस्त्रसज्ज सैनिक हेलिपॅडवर उतरले. हेलिपॅडवर उतरलेल्या सैनिकांनी मोहिमेसाठी आवश्यक असलेले साहित्य आपल्या पाठीवर घेतले होते. याशिवाय विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी ते सज्ज होते. हेलिपॅडवरून अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत व जपानचे सैनिकानी प्रस्थान केले.
नागरिकाना ओलीस ठेवलेल्या जागेचा ठावठिकाणा सैनिकांना समजल्यामुळे त्यांनी ओलिसांची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी योजना आखली. योजनेनुसार नकाशा आणि जीपीएसच्या सहाय्याने भारत -जपानच्या सैन्याच्या तुकडीने प्रस्थांन केले. सध्या युक्रेनमध्ये जो युद्धाचा भडका उडाला आहे. त्या युद्धाचा थोडाफार थरार आजच्या या भारत-जपान यांच्या संयुक्त कवायतीमधून उपस्थितांना अनुभवता आला.
भारत आणि जपानचे प्रत्येकी 40 सैनिक या संयुक्त लष्करी कवायतीत सहभागी झाले आहेत. कमांडोना प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या बेळगावच्या ज्युनियर लीडर्स विंग अर्थात कमांडो विंगमध्ये भारत आणि जपान यांच्या संयुक्त लष्करी कवायत सहभागी झालेल्या सैनिकांनी प्रॅक्टिकलसह भारत आणि जपानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आजच्या मोहिमेबद्दल माहिती दिली.
‘धर्म गार्डियन -2022’ हा लष्करी कवायत भारतात गेल्या 2018 पासून आयोजित केला जाणारा वार्षिक लष्करी प्रशिक्षण उपक्रम आहे. विशेष म्हणजे भारत विविध देशांसमवेत ही लष्करी प्रशिक्षण कवायत करत आला आहे. यावेळी जपान सोबत केला जाणारा ‘धर्म गार्डियन’ ही लष्करी कवायत सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उभय देशांसाठी सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने निर्णायक आणि लक्षणीय असा आहे.
प्लाटून पातळीवर हा सराव जंगल प्रदेशासह निमशहरी व शहरी भूप्रदेश व्याप्तीत केला जात आहे. भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील 15 व्या बटालियनमधील युद्धनिपुण अनुभवी तुकड्या (ट्रूप्स) आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सची (जेजीएसडीएफ) 30 वी इन्फंट्री रेजिमेंट यंदाच्या संयुक्त लष्करी कवायतीमध्ये सहभागी आहे.
गेल्या 27 फेब्रुवारी पासून दोन्ही देशातील लष्करी कवायती होत असून आगामी दोन दिवसात याची सांगता होणार आहे.