बेळगाव सुवर्ण विधानसौध सभोवताली अर्धा कि. मी. परिघामध्ये हरितपट्टा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काल सोमवारी दिली आहे. यापूर्वी बुडाने सुवर्ण सौधच्या 1 कि. मी. परिघात हरितपट्टा तयार करण्याचा ठराव केला आहे.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने अर्थात बुडाने आपला ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असला तरी अद्याप तो मंजूर झालेला नाही. त्यामुळे सुवर्ण विधानसभेच्या 1 कि. मी. परिघातील जमिनी खरेदी करून तेथे निवासी वसाहती तयार केल्या जात आहेत. कांही ठिकाणी व्यापारी व औद्योगिक आस्थापनाची निर्मिती केली जात आहे.
हरितपट्टा निर्मितीला शासनाकडून मंजुरी मिळालेली नसल्यामुळे निवासी वसाहती किंवा आस्थापनाच्या निर्मितीला हरकत घेणे प्रशासनालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महापालिका व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत सध्या 1 कि. मी. परिघात हरितपट्टा निर्माण करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या कांही वर्षांमध्ये सुवर्ण विधानसौधच्या 1 कि. मी. परिघातीलच कांही जमिनीचे बिगरशेती प्रस्ताव मंजूर झाले आहेत, शिवाय काही अस्थापनांची निर्मिती झाली आहे. त्यावर उपाय म्हणून मग अर्धा कि. मी. परिसरात हरितपट्टा तयार करण्याबाबत चर्चा झाली.
जिल्हाधिकार्यांनी तसा प्रस्ताव तयार करून तो मंजूर करण्याची सूचना अधिकार्यांना दिली. हरितपट्ट्याबाबतचा प्रस्ताव थेट बुडाकडून शासनाकडे पाठविल्यास मंजूर होत नाही, तो प्रस्ताव महसूल विभागाकडूनच म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे पाठवावा लागतो. त्यामुळे बुडाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यावर तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.