कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला.
कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर सिंग आणि सन्माननीय अतिथी म्हणून आरएमएस बेळगावच्या एडम ऑफिसर मेजर वाणी अलावात उपस्थित होते.
2021 -2022 सालातील बारावीच्या बॅचमध्ये 52 मुलींचा समावेश होता, ज्या कोरोना प्रादुर्भावाच्या आघातातून गेल्या होत्या. स्वागत आणि प्रास्ताविकानंतर दीपप्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली.
त्यानंतर प्रार्थनेसह हातात पेटत्या मेणबत्त्या घेतलेल्या विद्यार्थिनींचा शपथविधी पार पडला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवर आणि समयोचित विचार व्यक्त करून बारावीच्या विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अखेर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने गेली दोन वर्ष शाळेत राहून कोरोना महामारी ला समर्थपणे तोंड दिलेल्या विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला. याप्रसंगी निमंत्रितांसह कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. रात्रीच्या स्नेहभोजनाने समारंभाची सांगता झाली.