मराठा मंडळ हायस्कूल, चव्हाट गल्ली या शाळेमधून 1983 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम आणि स्नेहमिलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील हेरिटेज किचन सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा वैदिक पद्धतीने सत्कार करत आशीर्वाद घेतले. याप्रसंगी गुरुजन सर्वश्री अनगोळकर, तिरवीर हट्टीकर, निलगार, एम. व्ही. पाटील, जी. एस. पाटील, व्ही. टी. पाटील , शिंदोळकर, वाय. एम. सुळेभावी वाय. के. पाटील आणि बेळगावकर यांच्यासह स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष अनंत जोशी, समूहाचे अध्यक्ष प्रशांत रामपुरे आणि सेक्रेटरी दत्ता जाधव व्यासपीठावर हजर होते.
प्रारंभी सृष्टी देसाई हिच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षक आणि वर्ग मित्रांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. संभाजीचे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर गतस्मृतींना उजाळा देत प्रत्येक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विलास खांडेकर यांनी निवेदनातून अनेक शिक्षकांच्या स्मृती जागविणाऱ्या गोष्टी सांगत सोहळा रंगतदार बनविला.
यावेळी काही शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केली. अनंत जोशी यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर सुनील तरळे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी अनंत पाटील, मारुती पाटील, नारायण कांबळे, सुनील चांदेकर, शिवाजी, घोडके, किसन पाटील, जी. ए. पाटील, चंद्रकांत काळभैरव आदी 1983 च्या बॅचचे दहावीचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. गप्पा-टप्पा होऊन स्नेहमिलन सोहळा खेळीमेळीत पार पडला.