देवलत्ती (ता. खानापूर) गावच्या श्री लक्ष्मीदेवी यात्रेत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वीज, पाणी आदी आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देवलत्ती ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
देवलत्ती (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील श्री लक्ष्मी देवी यात्रोत्सव सुमारे 26 वर्षानंतर यंदा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सदर निर्णयानुसार येत्या 12 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये देवलत्ती येथे श्री लक्ष्मीदेवी यात्रा आयोजित केली जाणार आहे.
तरी सदर यात्रोत्सवाला परवानगी देण्याबरोबरच यात्रेच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा व आरोग्य कर्मचारी नेमण्यात यावेत. त्याचप्रमाणे 24 तास वीज आणि पाणीपुरवठ्याची सोय केली जावी. यात्रेदरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासमवेत यात्रा कमिटीचे सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुखांना देखील सादर करण्यात आली.
खानापुरात ‘यांचे’ सुरू आहे जनहितार्थ कार्य
खानापूर तालुक्यातील दुर्गम जंगल भागात असलेल्या वस्त्यांमधील लोकांना जीवनावश्यक साहित्याचा अर्थात रेशनचा पुरवठा व्हावा यासाठी नियती फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडे पाठपुरावा सुरू केल्यामुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे.
नियती फाउंडेशन मार्फत फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत या खानापूरच्या गावागावात जनहितार्थ अथकपणे काम करत आहेत. खानापुरात अशी अनेक गावे आहेत जी रेशन वितरणापासून वंचित आहेत. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेण्यासाठी त्यांना 10-15 कि. मी. चालत जावे लागते. तालुक्यातील अक्राळी, मोहिशेत, गवेगळी, कुरडवाडा, लोहारवाडा, अस्वोली, गवळीवाडा, राजगोली या दुर्गम गावांमध्ये शिधापत्रिकाधारकांची संख्या जास्त असून त्याला वेळेवर अन्नधान्य मिळत नाही यासाठी संबंधित गावकऱ्यांना सुरळीत रेशन पुरवठा केला जावा अशी विनंती डॉ. सोनाली यांनी अन्न व पुरवठा विभागाकडे केली आहे.
सदर गावे गेल्या 75 वर्षांपासून दुर्लक्षित असून या गावांमध्ये चांगल्या नागरी सुविधा नव्हत्या. तथापि आता या गावांच्या विकासासाठी डॉ. सोनाली सरनोबत सतत प्रयत्नशील असून याबद्दल लोक कौतुक करत आहेत. डॉ. सरनोबत यांनी देखील आपण कायम जनतेच्या हितासाठी आणि हक्कासाठी कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.