जगातील ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता व सौहार्द पूर्ण वातावरण निर्माण व्हावे यासाठी खास वैश्विक प्रार्थना करणार असून त्यामध्ये बेळगाव धर्म प्रांतातील ख्रिश्चन बांधव देखील सहभागी होणार आहेत.
व्हॅटिकन शहरांमध्ये आज सायंकाळी 5 वाजता वैश्विक प्रार्थनेला प्रारंभ होणार असून त्याच वेळी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 ते 10:30 वाजेपर्यंत बेळगावात प्रार्थना होणार आहे.
बेळगाव धर्म प्रांताचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी ही माहिती दिली. वैश्विक प्रार्थनेसाठी लोकांना निमंत्रित करावे, अशी विनंती आपण सर्व चर्चच्या प्रिस्टना (पुजारी) केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅम्प येथील कॅथेड्रल चर्च येथे रात्री 9:30 वाजता वैश्विक प्रार्थनेला प्रारंभ होण्यापूर्वी पवित्र मेरीचा पुतळा मिरवणुकीने आणला जाईल आणि यूकेरिस्टिक आराधना होईल.
वैश्विक प्रार्थनेचे रेकॉर्डिंग युट्युब वर रात्री 10:30 नंतर उपलब्ध असेल अशी माहिती बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिली आहे. युक्रेन आणि रशियासह संपूर्ण जगात शांती नांदू दे यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया, असे आवाहनही त्यांनी केले.