बेळगाव डीसीसी बँकेच्या रिक्त झालेल्या एका स्थानासाठी आज होत असलेल्या निवडणुकीत जारकीहोळी बंधू आणि कत्ती बंधू यांच्यात चुरस आहे. मात्र या निवडणुकीत माझी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील कृषी पत्तीन सहकारी संघाचा प्रत्येकी एक सदस्य डीसीसी बँकेच्या दहा सदस्यांच्या कार्यकारिणीवर असतो. या सदस्यांपैकी अशोक हावकन्नावर यांच्या निधनामुळे बँकेच्या कार्यकारिणीच्या सदस्यांची एक जागा रिक्त झाली आहे.
या जागेसाठी आज शनिवारी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी सध्या डीसीसी बँकेमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डीसीसी बँकेच्या कार्यकारणीच्या रिक्त झालेल्या एका सदस्य पदासाठी सध्या मतदान होत असून ही एकमेव जागा मिळवण्यासाठी बेळगावातील नेते मंडळींमध्ये चढाओढ लागली आहे.
माजी मंत्री विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हा जारकिहोळी बंधूंचा गट एका बाजूला आहे, तर दुसर्या बाजूला माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री उमेश कत्ती आणि मंत्री शशिकला जोल्ले हा गट ते एकमेव सदस्यपद मिळविण्यासाठी उत्सुक आहे. सदर सदस्य पदासाठी रामदुर्गचे फत्तेसिंग जगपाल, मुनवळ्ळीचे रवींद्र यळीगार आणि अथणीचे मयत अशोक हावकन्नावर यांचे चिरंजीव संजीव हावकन्नावर निवडणूक लढवत आहेत.
सदर निवडणुकीचा निकाल आज सायंकाळी चार नंतर जाहीर होण्याची शक्यता असून या निकालामुळे जिल्ह्याचे राजकारण बदलेल असा कयास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील साऱ्यांचे लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे.