भवानीनगर येथे गेल्या 15 मार्च रोजी घडलेल्या राजू दोड्डबोम्मण्णावर या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मयत राजूच्या पत्नीसह त्याच्या दोघा व्यवसायिक भागीदारांना अटक केली आहे. पत्नीनेच 10 लाखाची सुपारी देऊन राजू याची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मयत राजूची पत्नी किरण दोड्डबोम्मण्णावर (वय 26, रा. टिळकवाडी), राजूचा मित्र धर्मेंद्र घंटी (वय 52, मूळ रा. हलगा -बस्तवाड, सध्या रा. ओमनगर खासबाग) आणि शशिकांत शंकरगौडा (वय 49, मूळ रा. अलारवाड सध्या रा. हिंदवाडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा जणांची नावे आहेत.
धर्मेंद्र व शशिकांत हे दोघे राजूचे व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांना पत्नी किरणनेही साथ दिल्यामुळे खुनाचा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी किरण ही मयत राजू याची दुसरी पत्नी आहे. राजू याने आपल्या पहिल्या लग्नाबाबत किरणला अंधारात ठेवून तिच्याशी लग्न केले होते. याहून आश्चर्याची बाब म्हणजे राजूने आपल्या दोन्ही बायकांना अंधारात ठेवून आणखी एका मुलीशी विवाह केला होता.
त्याच्या पहिल्या दोन बायकांना प्रत्येकी दोन मुले आहेत आणि तिसरी बायको सध्या गर्भवती आहे. तिसरा विवाह केल्यानंतर राजूचे किरणकडे दुर्लक्ष होऊ लागले हा राग मनात धरून किरण हिने पती राजूचा काटा काढायचे ठरवले.
दुसरीकडे राजू याचे रिअल इस्टेट व्यवसाय येथील भागीदार शशिकांत आणि धर्मेंद्र यांच्याशीही बिनसले होते. बेळगाव येथील चनम्मानगरमध्ये तिघांनी मिळून अपार्टमेंट बांधण्याचे ठरवले. एकूण 36 फ्लॅटच्या निर्मितीची योजना होती. मात्र हे काम पूर्ण करण्यासाठी राजू चालढकल करत असल्याचे जाणवल्यामुळे भागीदार शंकरगौडा आणि घंटी यांचे पैसे अडकले आणि दुसरीकडे काम आहे पूर्ण होत नसल्याचे दिसून आले यातून त्यांच्यात मतभेद वाढले होते.
भागीदारीतील ही नाराजी किरण हिने हेरली आणि तिने शंकरगौडा व घंटी यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्यासोबत बैठक झाली आणि एक महिन्यापूर्वी तिघांनी मिळून राजूचा काटा काढायचे ठरविले. यादरम्यान राजू याच्या खुनासाठी सराईत गुन्हेगारांची मदत घेण्याचेही त्यांनी ठरवले. त्यासाठी किरणने 10 लाखाची सुपारी दिली त्याप्रमाणे राजुची अनेकदा हत्या घडविण्याचा प्रयत्न झाला मात्र यश आले नाही.
अखेर गेल्या 15 मार्चला सकाळी 6 च्या सुमारास भवानीनगर येथे राजू मॉर्निंग वॉकिंगसाठी बाहेर पडला. त्यावेळी भवानीनगर रस्त्याशेजारी अज्ञातांनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. राजूच्या आरडाओरडीने परिसरातील लोक धावत घटनास्थळी येईपर्यंत मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला होता. या घटनेचे गुढ पोलिसांनी उलगडले असून आता सुपारी घेणारा आणि प्रत्यक्ष खून करणार्या गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रवींद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.