Sunday, November 17, 2024

/

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी :झाडांची पत्र्यांची पडझड

 belgaum

बेळगाव शहर परिसराला आज दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या तर कांही रस्त्यांवर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले.

बेळगाव शहर परिसरासह तालुक्याला आज शनिवारी दुपारी 3 -3:15 च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावल्यानंतर ढगाळ वातावरणासह सायंकाळपर्यंत पावसाची हजेरी अधून मधून सुरूच होती. यामुळे विशेष करून बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यामुळे खरेदी आणि कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली.

मुसळधार पावसामुळे शहरात स्मार्ट सिटीची विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण झाली. त्यामुळे अर्धवट विकास कामे झालेल्या रस्त्याच्या ठिकाणी ये -जा करताना नागरिक आणि वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. जोराच्या पावसामुळे शहरातील सखल भाग आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबून पाणी रस्त्यावरून वहात होते.

वादळी वाऱ्यामुळे वडगाव -येळ्ळूर रस्त्यासह शहर व तालुक्यातील कांही ठिकाणी रस्त्यावर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. वडगाव -येळ्ळूर मार्गावर झाडRainfall tree falls कोसळल्यामुळे येथील वाहतूक कांही काळ ठप्प झाली होती. तथापि ये-जा करणाऱ्या नागरिकांनीच झाड व फांद्या बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या रस्त्यावरील बीजे चा एक खांब देखील कोसळला.

झाडे -झाडाच्या फांद्या कोसळण्या बरोबरच कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना देखील घडल्या. वादळी वाऱ्यामुळे येळ्ळूरवाडी, येळ्ळूर येथील सरकारी कन्नड माध्यमिक शाळेच्या इमारतीचे पत्र्याचे मोठे शेड उडून खाली कोसळले.आज शनिवार अर्धा दिवस शाळा असल्यामुळे सुदैवाने त्यावेळी इमारतीखाली कोणी नव्हते अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. शहरातील महात्मा फुले रोड येथील जुन्या मारुती मंदिरासमोरील विजेचा खांब तसेच या रस्त्यावरील एक झाड कोसळल्याची घटना घडली.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स खडक गल्ली यांच्यातर्फे श्री चषक -2022 निमंत्रितांची अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशीच या पद्धतीने पावसाने हजेरी लावल्यामुळे दुपारनंतरचे सामने रद्द करावे लागले. यामुळे आयोजकांसह क्रिकेट खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीनं मदत कार्य

येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील आणि सहकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावर झाडं कोसळलेल्या घटनेची दखल घेतली आणि जे सी बी बोलावून अडथळा दूर केला

सतीश पाटील यांनी बोलताना सांगितले की दुपारी 3 वाजता येळ्ळूर व परिसरात जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. या मध्ये येळ्ळूर वडगांव रोडवर 8 ते 10 झाडे पडून वाहतूक 1 तास खोळंबली होती. हे समजताच मी आणि ग्रामपंचायत सदस्य राजू डोंन्यांनावर यांनी तातडीनं jcb बोलून रास्ता मोकळा केला तसेच येळ्ळूरवाडी प्राथमिक शाळा येळ्ळूर येथील स्लॅब वरचे पत्रे उडून खाली कोसळले यात कोणालाही कोणतीही दुःखापत झाली नाही आज शनिवार असल्याने शाळा अर्धा दिवस होती. यामुळे शाळेत कोणीही नव्हते ते पत्रे देखील बाजूला केले.

पावसामुळे घर कोसळून लाखोंचे नुकसान

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी मंडोळी रोड गोडसेवाडी येथे घडली.

कोसळलेले घर रविंद्र लक्ष्मण आवडणकर यांच्या मालकीचे आहे. बेळगाव शहर परिसरातला आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे मंडळी रोड गोडसेवाडी येथील आवडणकर यांचे जुने घर कोसळून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रविंद्र आवडणकर यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.