बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटल मध्ये सोमवारी मृत्यू पावलेल्या रांची झारखंड येथील एका बांधकाम कामगाराचा मृतदेह त्याच्या गावी पाठविण्यासाठी कर्नाटक सरकारने मंगळवारी खास रुग्णवाहिकेची सोय करून दिली.
समाजकल्याण खात्याच्या सचिव आणि दिलेल्या आदेशावरून बेळगाव जिल्ह्याच्या अधिकारी उमा सालीगौडर यांनी मयत बांधकाम कामगाराचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी त्याच्या तीन नातलगांना रुग्णवाहिकेच्या स्वरूपात वाहनाची सोय करून दिली. संबंधित कामगाराचा मृतदेह हवाईमार्गे अथवा रेल्वेने पाठवून देण्याचा विचार उमा सालीगौडर यांनी केला होता. तथापि बेळगाव येथून रांचीला जाण्यासाठी थेट विमान अथवा रेल्वेसेवा नसल्यामुळे अखेर रस्ते मार्गाने रुग्णवाहिकेतून त्या कामगाराचा मृतदेह त्याच्या गावी धाडण्यात आला. ही रुग्णवाहिका काल मंगळवारी दुपारी 3 वाजता रांचीच्या दिशेने रवाना झाली.
बांधकाम कामगार अल्बर्ट बारा (वय 50) यांच्या मृत्यूचे प्रकरण सोशल मीडियावर विशेष करून ट्विटरवरील कांही पोस्टमुळे गाजण्यास सुरुवात झाली. काही लोकांच्या मते बेळगाव जिल्ह्यातील एका गावातील लोकांनी चोर समजून मारहाण केल्यामुळे अल्बर्टचा मृत्यू झाला. काहींनी अल्बर्टच्या मृत्यूस कारणीभूत लोकांवर कारवाईची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे झारखंड सरकार सावध झाले आणि त्यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधला.
मयत कामगाराची पत्नी प्रथुलीथा हिने सांगितले की, तिचा पती अल्बर्ट गेल्या 11 मार्च रोजी अन्य दहा कामगारांसमवेत रांची होऊन रेल्वेने गोव्याला निघाला होता. मात्र अनवधानाने गेल्या 13 मार्च रोजी तो रायबाग रेल्वे स्थानकावर उतरला. दरम्यान इतर कामगारांनी आपला पुढील प्रवास सुरू ठेवला होता. त्यानंतर 16 मार्च रोजी मला फोन आणि मेसेज आला की अल्बर्ट याला बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर माझ्या पतीने 19 मार्च रोजी आमच्याशी बातचीत केली. आमची दोन वर्षाची चौथी मुलगी रोझी एंजल हिला पाहिले. मात्र अचानक सोमवारी सकाळी अल्बर्टचा मृत्यू झाल्याची बातमी आम्हाला कळाली असे तिने सांगितले. त्याला काय झाले होते मला माहित नाही? मी पूर्णपणे गोंधळून गेले आहे. तो रायबाग रेल्वेस्थानकावर का उतरला? का त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले? फोने कळविण्यात आल्यानंतर आम्ही येथे बीम्स हॉस्पिटलमध्ये आलो. आता पुढे काय करायचं मला कळेनासे झाले आहे. माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला आहे. मी माझी चार मुले आणि अन्य कुटुंबीय अशा सात जणांचा उदरनिर्वाह अल्बर्टच्या एकट्याच्या जीवावर सुरू होता, असे शोकाकुल प्रथुलीथा हिने स्पष्ट केले.
दरम्यान रायबाग पोलिसांनी अल्बर्ट बारा याच्यावर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. रायबाग रेल्वे स्थानकावरून उतरल्यानंतर अल्बर्ट दारू पिऊन आसपासच्या गावांमध्ये फिरत होता. त्याची विचित्र वागणूक पाहून रायबाग नजीकच्या हब्बनट्टी गावच्या लोकांनी त्याला पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर 15 मार्च रोजी त्याला रायबाग तालुका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याच दिवशी सायंकाळी त्याला तातडीने बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. विचित्र वागणुकीमुळे अल्बर्टला मनोरुग्ण वार्डात दाखल करण्यात आले होते.
दोन दिवसानंतर त्याची प्रकृती आणखी खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. अल्बर्टच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नसल्याची खातरजमा पोलिसांनी केली आहे. उत्तरीय तपासणीच्या अहवालात देखील पोलिसांच्या म्हणण्याला दुजोरा देण्यात आला असून अल्बर्ट बारा याचा मृत्यू अती मद्यपाना बरोबरच हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आहे.