आयुष्यात यशाचं शिखर गाठायचं असेल तर मनुष्याला अनेक आव्हानांना तोंड देत कठीण परिश्रमाद्वारे दर्जेदार काम करावे लागते. अंगामध्ये जिद्द, चिकाटी, मोठे ध्येय उराशी बाळगून आज अनेक जण यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे करताना आयुष्यामध्ये एखाद्याला नियतीची साथ मिळाली नाही तर जग सोडून जावे लागल्याने त्याची स्वप्न अधूरी राहतात. हलगा येथील अंकिता गुंडू बाळेकुंद्री ही महत्वाकांशी -जिद्दी होतकरू युवा महिला वेटलिफ्टर अशाच दुर्दैवी लोकांपैकी एक म्हणावी लागेल.
लक्ष्मी गल्ली, हलगा येथील होतकरू वेटलिफ्टिंग खेळाडू व हुशार विद्यार्थिनी कुमारी अंकिता गुंडू बाळेकुंद्री (वय 25) हिचे काल शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी आजारपणामुळे निधन झाले. एक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंकिताचे वडील गुंडू हे शेतकरी व व्यवसायाने गवळी व्यवसाय करतात. अंकिता त्यांची तिसरी मुलगी जी लहानपणापासूनच सुदृढ आणि मन मोकळ्या स्वभावाची हसतमुख मुलगी होती. हलगा प्राथमिक मराठी शाळेमध्ये 7 वी पर्यंतचे शिक्षण तसेच शारदा मुलींच्या माध्यमिक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेणारी अंकिता घरात सर्वांची लाडकी होती. शाळेत हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाणारी अंकिता शिक्षणाबरोबरच वेटलिफ्टिंग या खेळाकडे आकर्षित झाली. त्यावेळी शाळेचे क्रीडाशिक्षक रामा हणमंताचे यांचे तिला प्रशिक्षण व सहकार्य मिळाले. नियमित सराव व जिद्द या जोरावर तिने नववी व दहावी या शैक्षणिक वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने अनेक पदके मिळविली होती.
शारदा हायस्कूलमध्ये ती एक आदर्श विद्यार्थिनी होती. अंकिताने वेटलिफ्टिंग व शिक्षण दोन्हीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आपली वाटचाल सुरू ठेवली होती. दहावी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन ती शाळेमध्ये पहिली आली होती. यानंतर पुढील शिक्षणाकरिता तिने ज्योती पदवीपुर्व कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. बारावीनंतर बीएस्सीला असताना शिक्षणाबरोबरच तिचे वेटलिफ्टिंगही सुरुच होते. वेटलिफ्टिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये तिने बक्षिसे मिळविली. भाऊराव काकतकर कॉलेजमध्ये असताना ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ हा किताब तिने पटकाविला होता.
पदवी शिक्षणही चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर एक अधिकारी होण्याच्या ध्येयाने ती स्पर्धात्मक परीक्षाकडे वळली होती. आपले लक्ष केंद्रित करुन एक ध्येय समोर ठेवून तिची वाटचाल सुरू होती परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. अचानक जडलेल्या आजारामुळे तिचे शुक्रवारी 25 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे एक होतकरू क्रीडापटू व हुशार विद्यार्थिनीला हलगा गाव मुकला आहे. अंकिताच्या जाण्याने आज हलगा गावावर शोककळा पसरली आहे. तरुण वयातील हुशार आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणारी ही खेळाडू अचानक निघून गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शारदा माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेणारी अंकिता ही शिस्त पाहणारी प्रामाणिक विद्यार्थिनी होती. दिलेला अभ्यास वेळेवर करणारी अंकिता आठवी, नववी दहावीमध्ये सर्व परीक्षांमध्ये वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत असे. शाळेत असताना वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीपर्यंत सहभाग घेऊन तिने आमच्या शाळेचे नांव उज्वल केले. तिच्या जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे व एक चांगल्या विद्यार्थिनीला आम्ही गमावले आहे, अशी श्रद्धांजली शारदा हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. के. बेळगोजी यांनी वाहिली आहे. अंकिता आणि मी पहिली ते दहावी पर्यंत एका वर्गांमध्ये शिक्षण घेतले होते. मी तिला अगदी जवळून पाहिले आहे. लहानपणापासूनच ती हुशार होती. शाळेत शिक्षणासह प्रत्येक गोष्टींमध्ये ती सर्वापेक्षा सरस होती. यामुळे ती शिक्षकांची आदर्श विद्यार्थिनी होती. तिच्या जाण्याने आम्हाला धक्काच बसला आहे, अशा शब्दात अंकिताची वर्गमैत्रीण रितू हिने शोक व्यक्त केला.