शहराला उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी कार्यरत असलेल्या बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या नमुन्यांपैकी एक म्हणजे फोर्ट रोड आणि सीबीटी समोरील खडेबाजार कॉर्नर हे रस्ते म्हणावे लागतील. या रस्त्यांवर पूर्णपणे पेव्हर्स अथवा कॉंक्रिटच न घालता कांही ठिकाणी ते बोडके ठेवण्यात आल्यामुळे वाहन चालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण आणि दुरुस्ती केली जात आहे. मात्र कांही बोटावर मोजण्या इतके रस्ते वगळता बहुतांशी रस्ता त्यांचे काम निकृष्ट झालेले आहे. कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा आणि काम करण्याची वृत्ती तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांचे काम व्यवस्थित पूर्ण झालेले नाही.
फोर्ट रोड या रस्त्यावर कांही ठिकाणी सिमेंट काँक्रेट अथवा पेव्हर्स बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी कायम रहदारी असणाऱ्या या रस्त्याचा दगड -माती, खडीमुळे भरून गेलेला संबंधित बोडका भाग वाहन चालकांसाठी विशेषकरून दुचाकी वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
हीच परिस्थिती सीबीटी समोरील खडेबाजार कॉर्नर या रस्त्याची आहे. या ठिकाणीही रस्त्यावर पूर्णपणे पेव्हर्स घातलेले नाहीत किंवा काँक्रिटीकरण केलेले नाही. शहरातील बीएसएनएल कार्यालय नजीकचा हेड पोस्ट ऑफिस रोड या रस्त्याचे काम देखील व्यवस्थित करण्यात आलेले नाही. या रस्त्याच्या ठराविक भागाच्या पुढे पेव्हर्सचा पत्ताच नाही. खरंतर संबंधित ठिकाणी पेव्हर्स बसवून खानापूर रोडला जोडणारा रस्त्याचा हा भाग वाहतुकीसाठी सुलभ केला गेला पाहिजे. मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे.
या पद्धतीची रस्त्यांची निकृष्ट कामे पाहून सदर रस्त्यांची निर्मिती करणाऱ्या मृत मेंदूच्या लोकांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या या पद्धतीच्या निकृष्ट कामासंदर्भात काहींनी थेट दिल्लीपर्यंत तक्रार केली होती. त्यावर ‘आम्ही कामाचे निरीक्षण केले आहे आणि आमच्या मते सर्व कामे समाधानकारक आहेत’, असे उत्तर दिल्ली येथून आल्यामुळे संबंधित जागरूक नागरिकांवर कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे.