बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करून कुमारस्वामी ले-आउट येथे दोन नव्या उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. या कामाचे कंत्राट देण्यासाठी बुडाकडून निविदाही काढण्यात आली आहे.
बॉक्साइट रोडच्या बाजूला बुडाने कुमारस्वामी ले-आउट ही निवासी वसाहत 2007 मध्ये स्थापन केली आहे. गेला डिसेंबरमध्ये या वसाहतीचे बुडाकडून महापालिकेकडे हस्तांतरण झाले आहे. त्यावेळी महापालिका व बुडा यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. वसाहतीमधील प्रलंबित कामे हस्तांतरणानंतरही बोर्डाकडून पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी बोर्डाकडून निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच बुडाने त्या ठिकाणी दोन उद्यानांची कामे हाती घेतली आहेत.
सदर उद्यानांपैकी एका उद्यानासाठी बुडा 59 लाख 50 हजार रुपये तर दुसऱ्या उद्यानासाठी 76 लाख रुपयांचा निधी खर्च करणार आहे. ही निविदा प्रक्रिया अल्पावधीत मुदतीचे असून 28 फेब्रुवारी रोजी ती पूर्ण होणार आहे. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला तर मार्चमध्ये दोन्ही उद्यानांचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी ले-आउट मधील ज्या भूखंडांची विक्री झाली आहे, त्यापैकी बहुतेक ठिकाणी घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील लोकवस्ती वाढली असल्यामुळे तेथे उद्यान निर्मिती केली जाणार आहे.