बेळगाव शहरातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या प्रयत्नांमुळे असहाय्य अवस्थेत पडलेल्या एका कोकिळेसह विजेच्या धक्क्यामुळे जखमी झालेली घार अशा दोन पक्षांना जीवदान मिळाले आहे.
याबाबतची माहिती अशी की, आज गुरुवारी सकाळी भाग्यनगर तिसरा क्रॉस येथील एका घराच्या आवारामध्ये एक कोकीळ पक्षी पडला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना देण्यात आली. दरेकर यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन त्या कोकिळेला ताब्यात घेतले. तपासणी केली असता कोकिळेला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्याचप्रमाणे काल बुधवारी कोनवाळ गल्ली येथे एका पथदीपाखाली एक घार जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती संतोष दरेकर यांना देण्यात आली. तेंव्हा दरेकर यांनी तातडीने कोनवाळ गल्ली येथे जाऊन घारीला ताब्यात घेतले असता जिवंत विद्युत तारेतील विजेच्या धक्क्यामुळे ती जखमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संतोष दरेकर यांनी दोन्ही पक्षांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना एखादा पशू पक्षी जखमी अवस्थेत आपल्या घराजवळ अथवा रस्त्यावर पडलेला आढळून आल्यास त्यांनी 9986809825 या क्रमांकावर आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही दरेकर यांनी केले आहे.