राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अश्लिल सीडी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सदर प्रकरणात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधात कोणताही पुरावा आढळला नसल्याचे बेंगलोर शहर न्यायालयासमोर सादर केलेल्या आपल्या ‘बी’ रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे.
एसआयटीने सादर केलेल्या ‘बी’ रिपोर्टमध्ये माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
‘बी’ रिपोर्ट म्हणजे तुमच्यावर गुन्हा नोंदवून खटला दाखल करण्यासाठी पोलिसांना कोणतेही पुरावे आढळले नाहीत असे स्पष्ट करणारा आरोप रद्द करणारा अहवाल होय. एसआयटीकडून क्लीनचिट मिळाल्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या जारकीहोळी यांच्या शक्यता वाढल्या आहेत.
गेल्या 2021 साली अश्लील सीडीच्या अनुषंगाने बलात्काराच्या आरोपामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पीडितेने गेल्यावर्षी बेंगलोर कब्बन पार्क पोलिस ठाण्यात रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली होती.
तथापि तपास अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात त्याचा उल्लेख सहमतीचे लैंगिक संबंध असा केला आहे. एसआयटी अधिकाऱ्यांच्या मते तपासादरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.
त्यासाठीच न्यायालयासमोर ‘बी’ रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी रमेश जारकीहोळी जोरदार लॉबिंग करत असून नुकतीच त्यांनी गोवा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.