बजरंग दल कार्यकर्ता हर्षा याच्या हत्येप्रकरणी शिमोगा पोलीसांनी 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच शिमोग्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणाखाली आहे अशी माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी दिली.
बेंगलोर येथे गृहमंत्री आरोग्य ज्ञानेन्द्र पत्रकारांशी बोलत होते. शिमोग्यातील बजरंग दल कार्यकर्ता हर्षा यांच्या हत्येप्रकरणी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तेथील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
पोलीस या प्रकरणाचा सर्वांगाने तपास करत आहेत. भा.द.वि. कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश कायम असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, शिमोग्याचे जिल्हाधिकारी सेल्वामनी यांनी मंगळवारी सर्व शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या रविवारी रात्री पाच -सहा जणांच्या एका टोळक्याने कामत पेट्रोल पंपानजीक सिग्गेवाडी येथील हर्षा या युवकाची हत्या केली होती. कार गाडीतून आलेल्या युवकांच्या टोळक्याने बजरंग दलाचा कार्यकर्ता असणाऱ्या हर्षावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला होता.
‘डीकें’च्या आरोपावर गृहमंत्री भडकले
कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने शिमोग्यात हर्ष या कार्यकर्त्याची हत्या झाली या डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र चांगलेच भडकले. त्यांच्या सत्ताकाळात अशी कोणती घटना घडली नव्हती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे, असे आव्हानच त्यांनी शिवकुमार यांना दिले.
बेंगलोर येथे आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री आरोग्य ज्ञानेन्द्र म्हणाले शिवकुमार यांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या या आरोपावर मी चर्चा करणार नाही मात्र त्यांचे सरकार असताना कायदा व सुव्यवस्था सुरळीत होती हे त्यांनी छातीठोकपणे सांगावे. त्यांच्या किती गृहमंत्र्यांनी राजीनामे दिलेत हे मी सांगेन. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या टिके पेक्षा या राज्यात शांतता नांदणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेला उत्तर देण्याऐवजी आमचे काम आम्ही करू. राज्यात शांतता सुव्यवस्था राखू, असे गृहमंत्री म्हणाले.
हत्येची घटना राजकीय हेतूने प्रेरित आहे का? अशी चर्चा राज्यात आहे. याबाबतच्या प्रश्नावर गृहमंत्री आरोग्य ज्ञानेन्द्र म्हणाले, तशी शंका आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. यामागे काँग्रेसच्या कोणाचा हात आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे. शिमोगा पोलीस अलर्ट झाले आहेत. शिमोगा ड्रग्ज हब झाले आहे. हा प्रदेश अतिशय संवेदनशील झाला आहे. अलीकडेच पोलिसांनी या ठिकाणी अनेक क्विंटल गांजा जप्त केला आहे. अनेकदा चांगले अलर्ट राहू नये अशा घटना घडतात. मात्र आम्ही सखोल तपास करून दोषींना शिक्षा करू. भविष्यात कोणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही असा धडा शिकवू असे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी स्पष्ट केले.