सांबरा येथील प्राथमिक मराठी मुला -मुलींची शाळा गेल्या 15 वर्षापासून मुख्याध्यापकांअभावी नेतृत्वहीन बनली असून या ठिकाणी तात्काळ मुख्याध्यापकांची नेमणूक केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कोणत्याही शाळेचे कामकाज, ज्ञानदानाचे कार्य व्यवस्थित नियोजनबद्ध पार पडण्यासाठी मुख्याध्यापकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. तथापि सांबरा येथील प्राथमिक मराठी मुला -मुलींची शाळा दुर्दैवाने याला अपवाद ठरली आहे. सदर शाळेमध्ये गेल्या चक्क 15 वर्षापासून मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.
परिणामी शाळेतील शिक्षकांकडून कसेबसे शाळेचे कामकाज चालविले जाते. अलीकडे या शाळेमध्ये शिक्षकांची देखील कमतरता निर्माण झाली आहे. यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
बेळगावसह सीमाभागातील अल्पसंख्यांक मराठी भाषिकांसाठी असणाऱ्या मराठी शाळांवर अन्याय होत असल्याचा आरोप अलीकडे करण्यात येत आहे. मराठी शाळांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार आवाज उठविला आहे. मुख्याध्यापक नसलेली सांबरा प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळा हे सीमाभागात मराठी शाळांवर कशाप्रकारे अन्याय केला जात आह
याचे जिवंत उदाहरण आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. तरी लोकप्रतिनिधींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन सांबरा मराठी शाळेमध्ये तात्काळ मुख्याध्यापकांची आणि आवश्यक शिक्षकांची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी पालक आणि समस्त गावकऱ्यांकडून होत आहे.