बेळगाव लाईव्ह विशेष: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर निवडून आलेले माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेले अनेक दिवस चर्चा समोर येत होती. आणि शेवटी सोमवार दि. २१ फेब्रुवारी रोजी माजी आमदारांनी भाजपशी हात मिळवणी केली. माजी आमदारांनी केलेल्या हातमिळवणीनंतर त्यांना संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांकडून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
मागीलवेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर हे देखील भाजपच्या दारी गेले होते. मात्र त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने ते स्वगृही परतलेत. आता माजी आमदार अरविंद पाटील यांचाही शिवाजी सुंठकर होणार! असे मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय अशा फितूर माजी आमदारांच्या भाजप प्रवेश नंतर खानापूरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचाच उमेदवार आमदारपदी निवडून येणार असा विश्वास देखील मराठी भाषिक जनता व्यक्त करत आहे. इतकेच नाही तर माजी आमदारांना ‘दिल्या घरी सुखी रहा!’ असा सल्लाही देण्यात येत आहे. माजी आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार होत असून माजी आमदारांचा भाजप प्रवेश हा डुबत्या जहाजाप्रमाणे आहे त्यांची भाजप एंट्री मुळे ‘सुंठी वाचून खोकला गेला’ असल्याचेही म्हटले जात आहे.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी बेंगळूर येथे काही कार्यकर्त्यांसमवेत भाजप राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून यानंतर सीमाभागात मात्र त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी मराठी भाषिकांच्या मतांचा जोगवा मागून, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर आमदार म्हणून निवडून येऊन अरविंद पाटलांनी समितीशी बेईमानी केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या दारी जाणाऱ्या अरविंद पाटलांना विधानसभा उमेदवारी देण्यात येणार असल्यामुळे अरविंद पाटील यांनी समितीकडे पाठ फिरविली असल्याचेही बोलले जाते आहे.
मराठी भाषिकांच्या नावावर निवडणूक जिंकून येऊन आमदारकी भूषविणारे माजी आमदार अरविंद पाटील हे नेहमीच भाजपच्या बाजूने प्रचार करत होते. अनेकवेळा त्यांनी जाहीरपणे भाजपचा प्रचार केला असून त्यांच्या भाजप प्रवेशाची कुणकुण अनेक दिवसांपासून जनतेला लागली होती. अखेर भाजपाची पायरी माजी आमदारांनी झिजवली असून त्यांचा भाजप प्रवेश ही बाब लाजिरवाणी असल्याचेही बोलले जात आहे.
या अगोदर महाराष्ट्र एकीकरण समितीला रामराम करून अनेकांनी राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला मात्र कुणीही राजकारण किंवा समाजकारणात म्हणावे तितके यशस्वी झाले नाहीत.आता आगामी काळात अरविंद पाटील यांच्या बाबतीत खानापुरात काय होईल हे येणारा वेळच ठरवणार आहे.