लोभ असावा ही विनंती….बेळगाव live पाच वर्षपूर्ती…..डिजिटल आणि सोशल मीडियाचे नवीन तंत्रज्ञान उदयास आले आणि पत्रकारितेची परिमाणे बदलली.लोकांना प्रत्येक घटनेची इतंभूत माहिती तात्काळ मिळणे गरजेचे वाटू लागले. जग जवळ आलं, माणसे प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला लागली. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊ लागल्या.परंतु त्याचबरोबर स्थानिक बातम्या त्वरित नागरिकांच्या पर्यंत पोचवणे गरजेचे बनले. आणि याच उद्देशातून बेळगावातील पहिले मराठी वेब न्युज पोर्टल बेळगाव लाईव्ह डॉट कॉम पाच वर्षांपूर्वी बेळगावकर जनतेच्या सेवेत रुजू झालं. बेळगावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची बेळगाव live च्या माध्यमातून जलद गतीने दखल घेतली जाऊ लागली आणि जनतेत ‘लाईव्ह ला आलंय, बघितलं का? हा शब्द परवलीचा झाला.प्रत्येक नवीन तांत्रिकबाब डिजिटल मीडियात बेळगावात पहिल्यांदा आणण्याचा मान बेळगावतील जनतेच्या आशीर्वादाने बेळगाव live ने मिळवला.
अनेकांनी या सोशल मीडियाच्या बाबतीत आशंका व्यक्त केली, पण शहरी आणि ग्रामीण भागाला सातत्याने प्रकाशात ठेवण्याचे, प्रत्येक महत्वपूर्ण घटनेची त्वरित दखल घेत बेळगाव live ने सातत्याने केले.बेळगाव live हे वेब न्युज चॅनेल न रहाता अनेकांना आपली समस्या निराकरण करण्याचे केंद्र बनले.बेळगाव live ने पाच वर्षात केलेल्या बातम्यातून अनेक खेळाडूना उत्तेजन मिळाले ,रुग्णांना उपचार मिळाले,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली.
मराठी भाषेचा हुंकार जागृत ठेवण्यात सातत्यपुर्णतेने आघाडीची भूमिका लाईव्हने घेतली. समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा वसा घेतलेले ‘बेळगाव live ‘प्रत्येक बेळगाव आणि परिसरातील घराघराचे अविभाज्य घटक बनले आहे.’बेळगावकरांचा आवाज’ ही बिरुदावली बेळगाव live ला बेळगावकर जनतेनी बहाल केली आहे.उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ही बेळगाव live ची कायमची भूमिका राहील. बेळगाव live चे पुढचे अनेक उपक्रम आहेत.,त्या प्रत्येक उपक्रमाला आपला उदंड आशीर्वाद लाभावा ही विनंती.
आमचे वाचक हेच आमचे प्रतिनिधी बनले आहेत.सगळ्यात पहिलेंदा बातमी ब्रेक करण्याची परंपरा गेल्या पाच वर्षापासून बेळगाव लाईव्हने जपली आहे.बातमी दिल्या नंतर कधीही त्या बातमीचा खुलासा करण्याची वेळ आजवर आलेली नाही हे परखड आणि निष्पक्ष पत्रकारितेचे उदाहरण आहे.बेळगावच्या जनतेला तर बेळगाव लाईव्ह हे आपले हक्काचे व्यासपीठ आहे असे वाटते.कोणतीही समस्या बेळगाव लाईव्ह ने मांडली की त्याचे निराकरण होणार असा विश्वास वाचकांना आहे .परदेशातून देखील अनेक वाचक आवर्जून बातमी वाचल्याचे कळवतात.आजवर वाचकांनी आणि हितचिंतकांनी दाखवलेला विश्वास आणि आपुलकी यामुळेच लाखोंचा टप्पा आम्ही ओलांडला आहे.असेच प्रेम आणि सहकार्य पुढील काळातही आपल्याकडून लाभेल याची खात्री आहे.
पाच वर्षांच्या काळात अनेक हितचिंतक, मार्गदर्शक, जेष्ठ पत्रकार,छायाचित्रकार साहित्यिक यांच्या मदतीनेच बेळगाव live बेळगावशी संबंधित जगभरात राहणाऱ्या मराठी जनतेचे ऑनलाईन मुखपत्र बनले आहे.
ज्या प्रमाणे गेल्या पाचवर्षात बेळगाव शहर आणि परिसरातील बातम्या ताज्या घडामोडींचा आढावा बेळगावकर जनतेत,देश विदेशात आम्ही तात्काळ पोचवल्या आहेत तेच काम इथून पुढेही सुरूच राहणार आहे. तरी लोभ असाच असू द्यावा!!!
प्रकाश बेळगोजी
संपादक बेळगाव live