शिमोगा येथे हिंदू कार्यकर्ता हर्ष यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळाले असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे आज सोमवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले शिमोगा परिसरातील जनतेला मी आवाहन करतो कि याप्रकरणी न्यायोचित मार्गाने सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे कोणीही संतप्त न होता संयम राखावा. या हत्येवरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान या हत्येवरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, तेंव्हा गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केली आहे यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, सिद्धरामय्या नेहमीच तर्कहीन बोलतात. हर्षची हत्या मुस्लिम गुंडांनी केल्याचे ईश्वरप्पा यांनी म्हटल्याचे निदर्शनास आणून देताच बोम्मई म्हणाले ईश्वरप्पा तसे बोलले म्हणून मी सुद्धा तसेच बोलले पाहिजे असे नाही. मात्र तपासात नेमके सत्य बाहेर येईल हे मात्र मी निश्चितपणे सांगतो, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
शिमोग्यात बजरंग दल कार्यकर्त्याची हत्त्या
कारगाडीतून आलेल्या अज्ञातांनी एका बजरंग दल कार्यकर्त्याची निघृण हत्या केल्याची घटना शिमोगा जिल्ह्यात उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडण्याबरोबरच प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले आहे.
कारगाडीतून आलेल्या अज्ञातांनी काल रविवारी रात्री 9:30 च्या सुमारास बजरंग दल कार्यकर्त्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून त्याला ठार मारले. तीर्थहळ्ळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याशेजारील वसाहतीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर आरोपी फरारी झाले आहेत. हत्या झालेल्या युवकाचे नांव हर्ष असे असल्याचे समजते. कारमधून आलेल्या पाच-सहा युवकांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील हर्ष याला शिमोगा येथील मग्गान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला. हर्ष हा या वर्षापासूनच बजरंग दलामध्ये कार्यरत झाला होता.