बेळगाव शहरात 20 हजार व्यापारी मिळकती आहेत. तथापि व्यापारी परवाने मात्र केवळ 9 हजार आहेत. व्यापारी मिळकती व व्यापार परवाने यांच्यातील ही तफावत दूर झाली पाहिजे, असा आदेश महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी दिला आहे.
मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी नुकतीच महसूल व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी व्यापार परवान्यांची संख्या, परवाने नूतनीकरण न केलेल्यांची संख्या यावरून आरोग्य विभागाला धारेवर धरले. शहरातील मिळकतींची संख्या दीड लाखापर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 20 हजार मिळकती या व्यापारी स्वरूपाच्या आहेत. त्या इमारतींच्या संख्या एवढ्या परवान्यांचे वितरण महापालिकेकडून व्हायला हवे, असे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याकडे व्यापार परवान्यांबाबत विचारणा केली. त्यावर शहरातील 9 हजार व्यापाऱ्यांकडे परवाने असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यावर उर्वरित 11 हजार इमारतीमध्ये व्यवसाय केला जातो की नाही? असा सवाल आयुक्तांनी केला. त्यावर सर्वच व्यापारी इमारतींमध्ये व्यवसाय केला जातो असे नाही तरीही शहरातील अशा इमारतींचा शोध घेऊन तेथील व्यापाऱ्यांनी परवाने घेतले आहेत की नाही? याची पडताळणी केली जाईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. डुमगोळ यांनी सांगितले.
अनेक व्यापाऱ्यांनी परवान्यांचे नूतनीकरण केलेले नसून यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना आयुक्तांनी केली. चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट महसूल विभागाला देण्यात आले असून ते कोणत्या स्थितीत पूर्ण करावे, असे आयुक्त म्हणाले. बैठकीला प्रभारी महसूल उपायुक्त एम. एस. बन्सी, आरोग्य अधिकारी डाॅ. डुमगोळ, महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.