स्वर्गीय सूर लाभलेल्या भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सकाळी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आणि तमाम भारतीयांची मने सुन्न झाली. त्यांच्या निधनानंतर बेळगावमधील गायकांनी आपल्या प्रतिक्रिया बेळगाव लाईव्हकडे व्यक्त केल्या.
टिळकवाडीतील राॅय रोड येथील अर्चना संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि बेळगावातील ज्येष्ठ गायिका अर्चना बेळगुंदी यांनी लता मंगेशकर यांच्या सारख्या गायिका होणे नाही संगीत म्हणजे त्यांचा आत्मा होता. त्या माझ्या अत्यंत लाडक्या गायिका होत्या. ‘जन पळभर म्हणतील हाय…’ हे त्यांचे गाणे मला अतिशय प्रिय असून संगीताच्या कार्यक्रमांमध्ये मी लतादीदींची गाणी प्राधान्याने गात असे असे सांगून त्यांच्या निधनामुळे एक उच्च दर्जाचा कलाकार संगीत क्षेत्रातील तळपता हिरा हरपला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
शहरातील स्वरांजली संगीत संस्थेचे संगीत शिक्षक विनायक मोरे म्हणाले की, लता दीदींच्या निधनामुळे संगीताचे सूर आज खरोखर पोरके झाले आहेत. संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. जगभरातील कोट्यावधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारा अलौकिक स्वर आज हरपला.
लतादिदींनी वेगवेगळ्या भाषांमधून असंख्य गीते गायली. विशेष म्हणजे जात-पात, धर्म, भाषा, प्रांत अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद आणि आत्मिक सुखशांती भरणाऱ्या त्यांच्या स्वर मैफिलीने आज अखेरचा श्वास घेतला. त्यांचं गाणं, त्यांचं बोलणं, त्यांच्या चेहर्यावरील आनंद, निष्पाप हास्य, स्वभावाप्रमाणे आवाजातील निरागसता, समाधानवृत्ती, साधेपणा सर्व काही दैवी होते. अनेक पिढ्या येतील आणि जातील पण लतादीदी कायम अजरामर राहतील असे सांगून लतादीदी देहरूपाने आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचा चिरंतर सूर सतत आपल्या सोबत कायम असणार आहे, असे मोरे म्हणाले. दरम्यान, गानकोकिळा लता मंगेशकर या 36 वर्षांपूर्वी बेळगावला आल्या होत्या. त्यांची बेळगाव भेट झाली होती, असेच जाणकारांकडून सांगण्यात आले.
रांगोळीद्वारे ‘यांनी’ वाहिली दीदींना श्रद्धांजली
भारतरत्न, स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांना बेळगावचे सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अजित औरवाडकर यांनी रेखाटलेली सदर रांगोळी 2 फूट बाय 3 फूट आकाराची आहे. औरवाडकर यांनी 5 तास मेहनत घेऊन रेखाटलेल्या या रांगोळीसाठी लेक कलरचा वापर केला आहे. अतिशय आकर्षक लक्षवेधी अशी ही रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे कलाप्रेमींना पहाण्यासाठी येत्या गुरुवार दि. 10 फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्रौ 9 पर्यंतखुली आहे.