यमगर्णी (निपाणी) गावात एका रात्रीत सहा घरफोड्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या धाडसी चोरीमध्ये चोरट्यांनी 10 तोळे सोने आणि 2 लाखाची रोकड असा सुमारे 10 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांच्या या प्रतापामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची माहिती अशी की, काल शनिवारी सकाळी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची कांही घरे उघडी असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकल्याचे निदर्शनास आले. एकामागून एक अशा सहा बंद घरांमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस येताच नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. चोरीच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी आणि बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोरीच्या घटनांचा पंचनामा केला. त्याचप्रमाणे ठसे तज्ञांसह पूजा या पोलीस श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानपथक घटनास्थळावरून बुदिहाळ रस्त्यापर्यंत जाऊन तिथेच घुटमळले.
बंद घरे लक्ष करताना चोरट्यांनी रेणुका मंदिरानजीक असणाऱ्या कल्लाप्पा रामा धनगर यांच्या घरातून लप्पा, बोरमाळ, गंठण, गळापेटी, अंगठी असे 5 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तेथून जवळच असणाऱ्या बंगारी हलाप्पा डोळे यांच्या घरातून 1 तोळा सोन्याचे दागिने आणि 20 हजाराची रोकड लंपास केली. याखेरीज मल्लाप्पा भागोजी पिसोत्रे यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने व 1.5 लाखाची रोकड लांबविली. बुदिहाळ रोड येथे रंगनाथ विलास पवार यांच्या घरातून कर्णफुले व कर्णवेल असे एक तोळा सोन्याचे दागिने व 11 हजाराच्या रोकड रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्याचप्रमाणे माळभाग येथील सिद्धू नागू डोळे यांच्या घरातील 1500 रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. निपाणी शहर आणि उपनगरात गेल्यात तीन महिन्यांत चोरट्यांनी अनेक घरे लक्ष्य केली आहेत. दिवसागणिक होणाऱ्या चोरीच्या घटना थांबविण्यात आणि चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.