सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी घेतला असून तसा आदेश आज सोमवारी जारी केला आहे. त्यानुसार श्री रेणुकादेवी मंदिरासह जिल्ह्यातील 9 मंदिरे आता दर्शनासाठी खुली झाली आहेत.
शासनाने कोरोना संबंधीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी आज मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याचा आदेश बजावला. त्यामुळे भाविकांचा देव दर्शनाचा मार्ग अखेर खुला झाला असून त्याची अंमलबजावणी देखील आजपासूनच करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केलेल्या 6 जानेवारी रोजी आदेश बजावत रेणुका मंदिरासह जोगनभावी येथील सत्यम्मा देवी मंदिर, विरभद्र देवस्थान गोडची रामदुर्ग, चिंचली मायाक्का देवी मंदिर, पंत महाराज मंदिर पंत बाळेकुंद्री, होळेम्मा देवी मंदिर बडकुंद्री, मल्लय्या देवस्थान मंगसुळी, बसवेश्वर देवस्थान खेडेगाव, रेणुका देवस्थान कोकटनूर अथणी ही मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. मात्र आता ही मंदिरे दर्शनासाठी पूर्ववत खुली करण्यात आली आहेत
बेळगावसह राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे संकट वाढल्याने राज्य सरकारने 4 जानेवारी रोजी नवे कडक निर्बंध लागू केले होते. यात रात्रीच्या कर्फ्यूसह विकेड कर्फ्यूचा देखील समावेश होता. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 17 जानेवारीला होणारी सौंदत्ती रेणुका देवी यात्रा देखील रद्द झाली होती.
शासनाने आता नियम शिथिल केल्याने मंदिरे देखील दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. दरम्यान सौंदत्ती रेणुका देवी मंदिर मागील कांही दिवस बंद असले तरी परंपरेनुसार भाविक रोज सामूहिकरीत्या डोंगरावर जात होते. डोंगराच्या पायथ्याशी जोगनभाव परिसरात देवीची सामूहिक पडली भरली जात होती. आता देवीचे दर्शन खुले करण्यात आल्याने भाविकांचा दर्शनाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. तथापि मंदिरे खुली करण्यात आली असली तरी कांही अटी लादण्यात आल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत.
1) मंदिर आणि मंदिर परिसरात यात्रा विशेष कार्यक्रम लोकांची गर्दी होईल असे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत, 2) दर्शनासाठी सोशल डिस्टंसिंग आणि फेसमास्कचा वापर सक्तीचा, 3) एका वेळी केवळ 50 लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ शकतात पण त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत,4) मंदिरात प्रवेश देताना थर्मल स्क्रीनिंग केले जावे.