कोरोना चा संसर्ग वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती रेणुका देवी मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील आठ मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली आहेत.मंदिर बंद करण्यात आल्या मुळे, 17 जानेवारी रोजी रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
रेणुकादेवी मंदिर दर्शनासाठी बंद आणि यात्रा रद्द झाली असतानाही भाविकांची होणारी गर्दी पोलिसांना डोकेदुखी ठरू लागली होती.भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती पोलिसांनी सर्व परिसराची नाकाबंदी केली आहे.
सौंदत्ती हुन मंदिराकडे जाणाऱ्या चारही मुख्य रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली आहे. मंदिर परिसर भाविकांना बंद ठेवण्यात आला आहे.
गुरुवार दिनांक 6 जानेवारीपासून मंदिर बंद ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.मात्र गेल्या तीन दिवसात मंदिर बंद असतानाही सौंदती डोंगराकडे भाविकांची गर्दी होऊ लागली होती. त्यामुळे सौंदत्ती डोंगर कडील मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माघारी पाठवण्यात येत आहे.
भाविकांनी घरातूनच देवीची आराधना करावी आणि मंदिर भाविकांना पुन्हा दर्शनासाठी खुले होईपर्यंत सौंदत्ती डोंगराकडे दर्शनासाठी येऊ नये. असे आवाहन मंदिर प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे.