बेंगलोर वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमधील शाळा नव्या नियमावलीचे अवलंब करून सुरूच राहतील, अशी माहिती शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी बेंगलोर येथे पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री नागेश म्हणाले की, बेंगलोर वगळता उर्वरित जिल्ह्यांमधील शाळा -कॉलेजीस सुरूच राहतील.
मुलांना कोरोना संसर्ग झाला तरच शाळा बंद ठेवाव्यात. शाळेतील पॉझिटिव्हिटी रेट वाढला, म्हणजेच जर 5 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर 3 दिवस शाळा बंद ठेवावी.
त्याचप्रमाणे जर 25 ते 30 मुले कोरोना बाधित आढळून आली तर अशा शाळा आठवडाभर म्हणजे 7 दिवस बंद ठेवाव्यात. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना असेल असेही त्यांनी सांगितले.
बेंगलोरमध्ये मात्र येत्या 29 जानेवारीपर्यंत शाळा बंद राहतील. त्यानंतर 29 रोजी बैठक घेऊन येथील शाळा पुनश्च सुरू करायच्या की नाही? याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगून मुलांमधील पॉझिटिव्हिटी रेट कमी आढळून आल्यामुळे राज्यातील शाळा -कॉलेजीस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले.