बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिर हे उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर आहे जिथं दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेत तर गर्दीचा महापूर असतो मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोरोना मुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे.
श्री रेणुका देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र तरीही प्रत्येक दिवशी हजारो भाविकांची सौंदती डोंगर पायथ्याशी गर्दी होत आहे. मंदिराकडे जाण्याचे सर्व रस्ते बॅरिकेडस टाकून बंद करण्यात आले आहेत. तरीही हजारो भाविक सौंदत्ती डोंगराकडे येत आहेत.
जानेवारी ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान दरवर्षी सौंदतीला रेणुका देवीची यात्रा भरत असते. यात्राकाळात उत्तर कर्नाटका सह गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीनुसार प्रत्येक गावातील भाविक सामूहिकरीत्या देवीच्या दर्शनासाठी सौंदतीला जातात. सौंदत्ती डोंगरावर वास्तव्य करून त्या ठिकाणी देवीची सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम होत असतो. यानंतर भाविक आपल्या गावी परत आल्यानंतर गावातील मोकळ्या जागेत स्थानिक यात्रा(मार्ग मळणी यात्रा) आयोजित करतात. परंतु कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून देवीची यात्रा झालेली नाही. तसेच देवीच्या दर्शनाला देखील अनेक वेळा निर्बंध लादण्यात आले आहेत.
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देवीचे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. यात्रा काळात देवीचे मंदिर बंद ठेवण्यात आल्यामुळे यात्रा रद्द झाल्या आहेत. मंदिर देवी दर्शनासाठी बंद असल्याची माहिती असतानाही भाविक सामूहिक पडली भरण्यासाठी डोंगरावर गर्दी करत आहेत.सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगनभाल तसेच आसपासच्या परिसरात भाविकांची गर्दी होत आहे.
हजारो भाविक सामुहिक पडली भरण्याचा कार्यक्रम याठिकाणी करत आहेत.कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना नागरिकांची गर्दी सध्या धोकादायक ठरू लागली आहे. प्रशासनाकडून केवळ डोंगरावर प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्या खाली इतर धार्मिक विधी पार पाडण्यासाठी लोकांना मोकळीक मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.